| उरण | प्रतिनिधी |
नागाव गावच्या सुकन्या विधिता मनीष घरत हिने वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी डॉक्टर होण्याचा मान मिळवला असून, नागावची पहिली महिला डॉक्टर म्हणून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे नागाव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.
नागावचे सुपुत्र आणि समिधा क्रिकेट क्लबचे मालक मनीष घरत यांची विधिता ही द्वितीय कन्या आहे. मनीष घरत यांनी क्रिकेट संघाचे मालक म्हणून नागावच्या क्रिकेट क्षेत्राला वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे नागावच्या क्रिकेट क्षेत्राची ओळख रायगड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. आता त्यांच्या कन्या विधिता हिने वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करून गावाच्या नावलौकिकात आणखी भर घातली आहे.
विधिताच्या या यशामुळे ती गावातील मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर मुलीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवू शकतात, हे तिने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. विधिता हिचे अभिनंदन करून तिला नागावचे अध्यक्ष वैभव यशवंत कडू यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. विधिताच्या या यशाबद्दल नागाव परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
विधिता घरत नागावची पहिली महिला डॉक्टर
