। बाकू (अझरबैझान) । वृत्तसंस्था ।
भारताचे चार खेळाडू विश्वकरंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले होते; पण उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्या टप्प्याच्या लढतीनंतर एका स्थानासाठी दोन भारतीय लढत आहेत. विदित गुजराती व डी. गुकेश या भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले असून आर. प्रग्नानंद व अर्जुन इरिगेसी यांच्यातील लढत 1-1 अशा बरोबरीत राहिल्यामुळे टायब्रेकमध्ये यांच्यातील विजेता ठरणार आहे. टायब्रेक उद्या (ता. 17) होईल. प्रग्नानंद व अर्जुन यांच्या लढतीतील विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन, अझरबैझानचा निजात एबासोव व अमेरिकेचा फॅबियानो कारुआना यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
मॅग्नस कार्लसन – डी. गुकेश यांच्यामधील उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्याच्या लढतीत कार्लसन याने विजय मिळवला होता. त्यामुळे गुकेश याला बुधवारच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक होते. गुकेश याने कार्लसनला कडवी झुंज दिली; पण त्याला विजय मिळवता आला नाही. ही लढत ड्रॉ राहिली. कार्लसनने दीड गुणांसह आगेकूच केली. निजात एबासोव – विदित गुजराती यांच्यामधील उपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही खेळाडूंना अर्धा गुण मिळाला होता. त्यामुळे दुसर्या टप्प्यात जो खेळाडू जिंकेल, त्याला आगेकूच करता येणार होती. निजात याने विदितला हरवण्याची किमया करून दाखवली. निजातने अंतिम चारमध्ये प्रवेश केला. दरम्यान, फॅबियानो कारुआना याने दीड गुणांसह घोडदौड केली.
आर. प्रग्नानंद – अर्जुन इरिगेसी यांच्यामधील उपांत्यपूर्व लढत रोमहर्षक ठरली. पहिल्या टप्प्यात अर्जुनने प्रग्नानंदला हरवले. प्रग्नानंदवर बुधवारच्या लढतीत दबाव होता. पण त्याने दुसर्या टप्प्यात विजय साकारून झोकात पुनरागमन केले व बरोबरी साधली. आता दोन खेळाडूंमध्ये टायब्रेकची लढत होईल.
जगज्जेत्याला आव्हान
यंदाचा जगज्जेता चीनचा खेळाडू डिंग लिरेन याला पुढच्या वर्षी कोणता खेळाडू आव्हान देईल, यासाठी कँडिडेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विश्वकरंडकातील अव्वल तीन खेळाडू कँडिडेट स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. निजात एबासोव, फॅबियानो कारुआन या दोघांसह आर. प्रग्नानंद व अर्जुन इरिगेसी या भारतीयांपैकी एकाला कँडिडेट स्पर्धेत खेळता येईल.