पुरुष,महिला संघाची दैदिप्यमान कामगिरी
। पॅरिस (फ्रान्स) । वृत्तसंस्था ।
भारतीय तिरंदाजांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील देदीप्यमान कामगिरी येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी (स्टेज फोर) स्पर्धेतही कायम राहिली. भारताच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांनी कंपाऊंड प्रकारातील सांघिक गटात अंतिम फेरीत धडक मारली. आता सुवर्णपदकासाठीच्या लढतीत भारतीय पुरुषांसमोर अमेरिकेचे; तर भारतीय महिलांसमोर मेक्सिकोचे आव्हान असणार आहे. भारतीय पुरुषांच्या संघात ओजस देवताळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक वर्मा या तिघांचा समावेश आहे. तसेच भारताच्या महिला संघामध्ये अदिती स्वामी, ज्योती वेन्नम व परनीत कौर या तीन खेळाडूंचा समावेश आहे.
भारताचा पुरुषांचा संघ पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर राहिला. त्यानंतर पहिल्या फेरीत इटलीशी दोन हात करावे लागले. भारतीय संघाने इटलीवर 239-235 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने मेक्सिकोवरही मात करीत उपांत्य फेरीत पाऊल ठेवले. भारतीय महिला संघाने पात्रता फेरीपासूनच शानदार कामगिरी केली. त्यांनी 2113 गुणांसह पात्रता फेरीत पहिले स्थान पटकावले. महिला तिरंदाजांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत इस्तोनियावर 233-230 आस विजय मिळवत भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत वाटचाल केली.
ग्रेटब्रिटनला उपांत्य फेरीत 234-233 असे नमवत भारतीय महिला तिरंदाजांनी सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने शानदार पाऊल टाकले. येत्या 19 ऑगस्ट रोजी दोन्ही गटांच्या अंतिम लढती खेळवण्यात येणार आहेत.
भारताचा पुरुषांचा संघ उपांत्य फेरीत कोरियाशी लढला. या लढतीत दोन्ही देशांमध्ये 235-235 अशी बरोबरी झाली. त्यानंतर शूटऑफचा अवलंब करण्यात आला. शूटऑफमध्ये दोन्ही देशांतील तिन्ही तिरंदाजांना प्रत्येकी एक बाण लक्ष्याच्या दिशेने सोडावा लागतो. या शूटऑफमध्येही दोन्ही देशांमध्ये 30-30 अशी बरोबरी झाली. ओजस देवताळे याचा बाण मध्यभागी अचूक निशाण्यावर लागला होता. त्याचाच बाण इतरांच्या बाणापेक्षा अचूक होता. त्यामुळे भारताला या लढतीत विजयी घोषित करण्यात आले.