महाड नगरपरिषदेचे देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष
| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये असलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या देखभालीकडे महाड नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेने योग्य ती काळजी न घेतल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे.
20 मार्च 1927 साली बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. हा लढा केवळ पाण्यासाठी केला नसून, जगातील सर्व मानव जातीच्या मूलभूत हक्कांसाठी केला होता. यामुळे महाडचे नाव जागतिक पटलावर नोंदवले गेले. महाड क्रांतीभूमीतील या ऐतिहासिक स्थळास दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक व आंबेडकरी अनुयायी अभ्यास करण्यासाठी भेट देतात. तसेच, बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मानवंदना देत असतात. परंतु, महाड नगरपरिषदेच्या दुर्लक्ष होत असल्यामुळे महामानवाच्या पुतळ्याची अतिशय वाईट व विद्रुप अशी अवस्था झाली आहे. पुतळ्याचा रंग उडून त्यावर पापुद्रे निघाल्यामुळे पुतळा विद्रुप दिसत आहे. वास्तविक, पुतळ्याची साफसफाई दररोज होणे गरजेचे आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या अपुरा कर्मचारी वर्ग आणि देखभाल दुरुस्तीकडे असलेले दुर्लक्ष यामुळे संपूर्ण चवदार तळ्याचा परिसर अस्वच्छ होत आहे. 6 डिसेंबर, 20 मार्च, 14 एप्रिल किंवा काही अपवादात्मक शासकीय कार्यक्रमावेळी पुतळ्याची साफसफाई, रंगरंगोटी किंवा पॉलीश केले जाते. महाड शहरातील इतर पुतळे सुस्थितीत असताना, ज्या स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीखाली असलेल्या चवदार तळ्यामधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची अशी वाईट अवस्था झाली आहे. संबंधित प्रशासनाकडून जाणूनबुजून बाबासाहेबांचा अवमान केला जातोय की काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते स्वरूप उर्फ मुन्ना खांबे यांनी केला आहे. महाड नगरपरिषदेचा हलगर्जीपणा व गलथान कारभार दिसून येत असून, याबाबत लवकरच आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील स्वरूप खांबे यांनी दिला आहे.
स्मारक परिसराची दुरवस्था
चवदार तळे हे एक राष्ट्रीय स्मारक आहे. मात्र, या राष्ट्रीय स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीकडेदेखील महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक असताना या पवित्र स्मारक वाहनतळ झालेले आहे. तलावाच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा आणि पाणी साचलेले आहे, त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांकडे जाणारा मार्गावरदेखील चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी असलेल्या लॉनचीदेखील स्वच्छता ठेवली जात नाही. तलाव परिसरात असलेल्या बगीचांचीदेखील दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी चांगल्या दर्जाची फुलझाडे लावण्यात आलेली नाहीत. मात्र, पालिकेने गेली अनेक वर्षे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करूनदेखील उत्तम दर्जाचे बगीचा तयार झालेला नाही, असा आरोपदेखील करण्यात येत आहे.