| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथे 28 वर्षे कार्यरत असलेल्या आणि दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा असलेल्या विद्या विकास मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेचा विस्तार केला जाणार आहे, अशी घोषणा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांत करण्यात आली. संस्था जमीन खरेदी करणार असून त्या माध्यमातून नवीन शैक्षणिक संकुल उभे करण्यासाठी कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती स्नेह संमेलन कार्यक्रमात देण्यात आली.
विद्या विकास मंदिर शाळेच्या माध्यमिक विभाग वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयकर आणि ऑडिट या पुस्तकाचे लेखक सुहास पेंडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी व्यासपीठावर विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष शशिकांत करंदीकर, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रसन्न खेडकर, कार्यवाह दिलीप कवाडकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुशील सुर्वे, अमित जोगळेकर, कार्यकारिणी बाळकृष्ण पादिर, वासुदेव पिंपुटकर, शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक शैलजा निकम, माजी मुख्याध्यापिका आसावरी काळे, भागवत कथाकार चितळे, शाळेच्या प्राथमिक मुख्याध्यापक विनया काकडे, बालवाडी मुख्याध्यापक स्नेहा म्हसे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्मिता दिघे, पालक संघाचे पदाधिकारी आणि स्नेह संमेलन प्रमुख कोमल पळसकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच संस्थेचे कार्यकारिणीचे माजी सदस्यविभावरी कारुळकर, वरदा परांजपे वर्षा मेहेंदळे यांची देखील उपस्थिती होती.
यावेळी शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम यांनी प्रास्ताविक करताना शाळेचा शैक्षणिक आढावा यांचे वाचन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लेखक सुहास पेंडसे यांनी आपल्या देशाने आपल्यासाठी जे काही केले आहे ते विसरू नका असा सल्ला दिला. या वार्षिक स्नेह संमेलनचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. त्यात गौरव महाजन आणि पूजा कोंडे यांनी सर्वांची वाहवा मिळविली. पाचवी ते नववी मधील विद्यार्थ्यांनी हर हर शंभो, आई तुझं देऊळ, महिला सक्षमीकरण नाट्य, ब्राझील जिमनॅस्टिक नृत्य, स्वच्छ भारत अभियान पथनाट्य, जागर गोंधळ, शिवबा आमुचा मल्हारी, प्लास्टिक मुक्त भारत, डोला रे, रिमिक्स डान्स, अष्टमी आई जगदंबे, स्वातंत्र्याची अमृतधारा, ही दोस्ती तुटायची नाही, आई मी येतेय ग अशी विविध गाणी सादर करीत सामजिक ऐक्याचे संदेश दिले. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांनी यश मिळविलेल्या स्पर्धांमधील पारितोषिक यांचे वितरण केले.
तसेच यावर्षीचे होतकरू विद्यार्थी म्हणून स्वराज अशोक साबळे, साक्षी दत्ता मते यांची निवड करण्यात आली. तर या वर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणुन दहावी मधील रोहित सुभाष पेरणे आणि अंजली सुरेश जामघरे यांना सन्मानित करण्यात आले. त्याचवेळी विद्यार्थी प्रिय शिक्षिका स्नेहा म्हसे यांचा देखील सन्मान करण्यात आला.