| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मतदान प्रक्रीया जिल्ह्यात राबविण्यात आली. मतमोजणी तीन डिसेंबरला होणार होती. परंतु, मतमोजणी पुढे ढकलण्यात आली असून, 21 डिसेंबरला मतमोजणी सर्व ठिकाणी होणार आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनावर पडली आहे. दहा नगरपरिषदेच्या हद्दीत स्ट्राँग रुम तयार करण्यात आले आहेत. या स्ट्राँगरुमच्या सुरक्षेसाठी रायगड पोलीस सज्ज असून 20हून अधिक दिवस पोलिसांचा 24 तास जागता पहारा राहणार आहे.
अलिबाग, पेण, कर्जत, उरण, माथेरान, महाड, श्रीवर्धन, रोहा, मुरूड, खोपोली या दहा नगरपरिषदांच्या निवडणूकीचे मतदान 2 डिसेंबरला झाले. 70 टक्केहून अधिक मतदान झाले. 2 लाख 37 हजार 503 मतदारांपैकी 1 लाख 66 हजार 857 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु, मतमोजणी लांबणीवर गेल्याने ईव्हीएम मशीन सुरक्षीत ठेवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.
अलिबागमधील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलच्या परिसरात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहे. या कक्षामध्ये स्ट्राँगरुम तयार करण्यात आले आहे. स्ट्राँगरुमध्ये ईव्हीएम मशीन सील बंद करून ठेवण्यात आल्या आहेत. अन्य नगरपरिषदेच्या हद्दीतदेखील स्ट्राँगरुम तयार करण्यात आले आहेत. या स्ट्राँगरुमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील दक्षता घेण्यात आली आहे. 15 पोलीस कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले असून, त्यात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पोलिसांची 12-12 तासाची ड्युटी असणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचीदेखील या स्ट्राँगरुमला रोज भेट दिली जाणार आहे. पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील या रुमसह परिसरात लावण्यात आले आहेत.
मुरूडमध्ये तहसीलदार कार्यालयात स्टाँग रुममध्ये आणण्यात आले. तद्नंतर स्ट्राँग रुम सील बंद करण्यात आले असून, आता या ठिकाणी व परिसरात 24 तास सिसिटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे .पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलिस बंदुकधारी, 10 एस.आर.पी पोलीस, 8 जिल्हा पोलीस व दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाड नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर स्ट्राँग रुम आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आठ कर्मचारी व दोन अधिकारी शस्त्रधारी असणार आहेत. श्रीवर्धन तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवन येथे स्ट्राँग उभारण्यात आले आहेत. याठिकाणी 20 पोलीस कर्मचारी नेमले आहेत. त्यात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पेणमध्ये केईएस हायस्कूलमधील परिसरात स्वतंत्र जागेत स्ट्राँग रुम तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित नेमणूक केली आहे. खोपोलीमध्ये लवजी येथे सेंटमेरी स्कूलच्या परिसरात स्ट्राँग रुम तयार केले आहे. या ठिकाणी मशीन ठेवल्या आहेत. सुरक्षेच्यादृष्टीने अंतर्गत व बाह्य कक्षात पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला आहे.
माथेरान, उरण, कर्जत, रोहामध्येदेखील स्ट्राँग रुमची निर्मिती करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांसह महसूल, नगरपरिषद विभागाचे अधिकारी या ठिकाणी नेहमी भेटी देणार आहेत. सुरक्षेची पाहणी करणार आहेत. त्यामुळे जिल्हयातील दहा नगरपरिषदांच्या हद्दीतील मत पेट्यांसह मशीनच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांचा जागता पहारा राहणार आहे. अठरा दिवस हा पहारा द्यावा लागणार आहे. त्यासाठी रायगड पोलीस तयार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आता राजकिय मंडळींचादेखील राहणार पहारा
नगरपरिषदेच्या निवडणूकीचे मतदान सोमवारी झाले. 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये स्ट्राँग रुमध्ये नजर राहणार आहे. पोलिसांच्या बरोबरच शासनाने राजकीय प्रतिनिधींसाठीदेखील स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची सुचना दिली आहे. त्यामुळे राजकीय मंडळीदेखील स्ट्राँग रुमच्या ठिकाणी पहारा देऊन राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना सुरक्षा आणि गोडावूनबाबत अवगत केले जाणार आहे. गोडावून सुरक्षेबाबत त्यांना पाहणी करता येणार आहे. मतदान यंत्र साठवणूकीच्या गोडावूनचे द्वार दिसेल, अशा ठिकाणी निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधींना बसण्याची जागा निश्चित केली आहे.
नगरपालिका स्टॉग रुमचे ठिकाण
अलिबाग जनरल अरुण कुमार वैद्य हायस्कुल
पेण : लिटल एजल स्कुल
खोपोली : सेंट मेंरीज हायस्कुल
मुरुड : दरबार हॉल, तहसिल कार्यालय
रोहा : जेष्ठ नागरिक सभा मंडप
कर्जत : नगरपरिषद कार्यालय
श्रीवर्धन : तहसिल कार्यालय
महाड : नगरपरिषद कार्यालय
उरण : नगरपरिषद कार्यालय
माथेरान : उपकोषागर कार्यालय
स्ट्राँग रुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहे. स्ट्राँग रुमच्या परिसरासह रुमच्या बाजूला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शस्त्रधारी पोलीस याठिकाणी असणार आहेत. सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्यात आली आहे.
सचिन हिरे
पोलीस निरीक्षक, खोपोली
