| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील रस्त्यांवर झालेली व सुरु असलेली नियमबाहय सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी तसेच कोल्हारे ग्रामपंचायतमधील मनमानी कारभारा विरोधात ग्रामपंचायतीचे सदस्य विजय हजारे यांनी मंगळवार दि.16 डिसेंबरपासून येथील साई मंदिराजवळील कोल्हारे-बोपेले चौक येथे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून या पूर्वी चार वेळा हजारे यांनी उपोषण केले आहे.
कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील कोल्हारे, धामोते परिसरातील शासकिय जमिनीवर सर्व अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामे काढून टाकणे आदी विषयांवर नेरळ कळंब रस्त्यावरील साई मंदिर चौक येथे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला अनेक राजकिय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. विजय हजारे यांनी आपल्या उपोषणात विविध 12 विषयांवर विविध शासकीय विभागातीप अधिकारी वर्ग यांच्याकडून न्यायाची मागणी केली आहे. त्यात नेरळ ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या राजिप वाणिज्य संकुल व विश्रामगृह इमारत खुली करण्यात यावी व इमारतीत बांधलेले गाळे वाटप करण्यात यावेत.
अनाधिकृत इमारतीमध्ये सुरु असलेल्या शाळेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. डिस्कव्हर रिसॉर्टची थकित घरपट्टी वसुल करावी. ग्रामपंचायत कार्यालयाच्या दुरुस्तीच्या कामाची मुदत संपून गेली तरी काम पूर्ण झालेले नाही. त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी. धामोते येथील भाड्याच्या गाळ्यात सुरु असलेले ग्रामपंचायत कार्यालय कोल्हारे येथील मुख्य कार्यालयात सुरु करावे. नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील मौजे धामोते हद्दीतील साईबाबा मंदिर ते द मॉर्निंग बिल्डिंग ते ब्रिजपर्यंत डीपी रस्त्याची मोजणी करून पेशवाई मार्गावर डीपी रस्त्यावर झालेली सर्व अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामे काढून टाकावी. या प्रमुख मागण्यांसह अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.







