विकास कॉलनी शाळेचे स्नेहसंमेलन

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकास कॉलनी शाळेत शनिवारी (दि.24) वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश पोळेकर, केदार जाधव, सुधा मोरे, प्रा. साळवे, शिवाजी सावंत आदी मान्यवरच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी भास्कर मसुरे यांनी संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच करत असते, असे मत व्यक्त केले.

प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच, वर्षभरामध्ये शाळेच्या यशामध्ये भरीव कामगिरी करणार्‍या विदयार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘मी सावित्री’ या नाटिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभांगी येलवे, निलम गायकवाड, सुनीता खेमनर, आरती पंकज यालवे, जगदीश कासे, हनुमंत शेळके, अदर्श पालक, प्रदीप लोभी, पालकवर्ग व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version