| पेण | प्रतिनिधी |
पेण नगरपालिकेने कागदी घोडे नाचवून विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेचा थांबा असलेली जागा म्हणजेच अंतिम भूखंड 100 वर बेकायदेशीर रस्ता करून विक्रम मिनीडोअर चालकांना येथून हुसकावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या विरोधात विक्रम मिनीडोअर चालकांनी आपल्या कुटुंबासमवेत पेण नगरपालिकेवर सोमवारी ( 13 फेब्रुवारी) धडक देण्याचे ठरविले आहे. सकाळी 11 वाजता शिवसेना नेते विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
पेण पालिका हद्दीत सर्व्हे नंबर 100 मध्ये 1994 -95 पासून टांगा टॅक्सीसाठी आरक्षण होते.परंतु 2018 च्या सुमारास कोणालाही कल्पना न देता या भुखंडावरील आरक्षण बदलून त्यावर पार्कींग म्हणून आरक्षित केले. ही पार्कींगची जागा 500 ते 600 तरुण आपल्या विक्रम मिनीडोअर येथे थांबवून उदरनिर्वाह करत आहेत. या जागेवरुन विक्रम मिनीडोअर चालकांना हलवल्यास त्यांना व्यवसाय करणे कठीण जाणार आहे. त्यामुळे ही जागा आहे त्यांच स्थितीत विक्रम मिनीडोअर चालक -मालक संघटनेला थांब्यासाठी कायमस्वरुपी मिळावी ही मागणी घेऊन विक्रम मिनीडोअर चालक -मालक संघटना पेण नगरपालिकेवर धडकणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे भुखंड 100 च्या बाजूला असलेला भुखंड 101 यामध्ये शॉपिंग मॉल कम भाजी मार्केट बांधण्यात आलेले आहे. या शॉपिंग मॉलच्या सभोवताली 4 मीटर रस्ता होता. परंतु ठेकेदाराने हा रस्ताच गायब केल्याने या शॉपिंग मॉल ला रस्ता देण्यासाठी नगरपालिकेची धडपड सुरु आहे. त्यामुळेच भुखंड 100 मधून रस्ता काढून विक्रम मिनीडोअर चालकांना हुसकावण्याचा षढयंत्र आहे. याविरोधात सर्वजण एकवटले आहेत.
या कौटुंबिक जनआक्रोश मोर्चासाठी सर्व पक्षीय प्रमुख नेते सामिल होणार आहेत. शिवसेनेकडून नरेश गावंड, जगदीश ठाकूर,शेकापचे संजय डंगर, डी.बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे (हरी ओम), तैलेश पाटील, शोमेर पेणकर, संतोष पाटील, मंगेश दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दयानंद भगत, यशवंत घासे, भाजप कडून मिलिंद पाटील, वासुदेव म्हात्रे आदी प्रमूख सर्व पक्षीय नेते मोर्चात सामील होणार आहेत.