| पेण | प्रतिनिधी |
शहरातील अंतिम भूखंड 101 मध्ये भाजी मार्केट आणि कमर्शियल शॉपिंग मॉलच्या इमारतीच्या अंतिम आराखड्यामध्ये सभोवताली असलेले रस्ते इमारत पूर्ण झाल्यानंतर गायब झाल्याचा आरोप होत आहे. तसेच याबाबत संबंधितांवर चौकशी व कारवाईची मागणी होत आहे. याबाबत पेण प्रांत कार्यालयात वेळोवेळी बैठका झालेल्या आहेत; परंतु, त्यावर तोडगा निघालेला नाही. सोमवारी उशिरा प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये नगरपालिका प्रशासन आणि विक्रम मिनिडोअर चालक संघटना यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली.
नगरपालिकेकडून मुख्याधिकारी जीवन पाटील आणि बांधकाम अभियंता सुहास कांबळे तर विक्रम मिनीडोअर चालक संघटनेकडून अध्यक्ष विजय पाटील तथा नगरसेवक संतोष पाटील, देवचंद पाटील हे आपले म्हणणे मांडत होते. तर, प्रांताधिकारी या दोन्ही पक्षामध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, एक तासाच्या चर्चेनंतरही या गोष्टीवर तोडगा न निघता 30 जानेवारीपर्यंत विक्रम मिनिडोअर चालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिलेला आहे.
पेण येथील भाजी मार्केट तथा शॉपिंग मॉलचे बांधकाम फेब्रुवारी 2018 ला सुरू झाले. त्यावेळी या इमारतीचा आराखडा निश्चित करण्यात आला, तेव्हा या शॉपिंग मॉलमध्ये जाण्यासाठी योग्य प्रकारे रस्त्यांची सोय केलेली होती. मात्र, जसजसे या इमारतीचे बांधकाम होण्यास सुरूवात झाली, तसतसे या इमारतीच्या ठेकेदाराने मन मानेल तसे आपले बांधकाम सुरू केले. मूळ नकाशावर (प्लॅन) असलेल्या रस्त्यांची रुंदी अचानक कमी होण्यास सुरूवात झाली. मूळ नकाशामध्ये इमारतीच्या सभोवताली तीन मीटरचा रस्ता असल्याचे दिसून येत आहे.
तसेच मागच्या बाजूस गाडी फिरवता यावी म्हणून इमारतीच्या मागच्या बाजूस दोन्ही कोपर्यांवर रस्त्यांची रुंदी जास्त आहे. ती म्हणजे विक्रम स्टँडच्या बाजूला 3.06 मीटर, तर सरकारी दवाखान्याच्या बाजूला 3.19 मीटर एवढी आहे. आता इमारत पूर्ण झाल्यावर विक्रम स्टँडच्या बाजूने समोर साडेआठ फूट, तर त्याच बाजूच्या मागच्या बाजूस अडीच फूट तर राधिका हॉटेलच्या बाजूने संरक्षण भिंत घालणे गरजेचे होते. परंतु, ती न घातल्यामुळे समोर तीन मीटरचा रस्ता उपलब्ध होत आहे. मात्र, राधिका हॉटेलच्या बाजूने संरक्षण भिंत घातल्यास या रस्त्यांची रुंदी निश्चितच कमी होईल. तर, बरोबर त्याच्या मागच्याच बाजूला सरकारी दवाखान्याच्या बाजूने 3.19 मीटर रस्त्यांची आवश्यकता होती, त्या ठिकाणीदेखील साडेआठ फूट रुंदीचा रस्ता आहे. ज्या वेळेला भाजी मार्केट तथा शॉपिंगमॉल बांधण्याचे ठरले, त्यावेळेला या इमारतीच्या सभोवताली (फळभाज्या) माल घेऊन येणार्या गाड्या फिरवता येतील अशा विचाराने या इमारतीची डिझाईन केली होती. परंतु, ज्या वेळेला इमारत पूर्ण झाली, त्या वेळेला मात्र आराखड्यात दिसणारे रस्ते गायब झाले, असे गाळेधारकांचे म्हणणे आहे. ठेकेदाराची चूक पाठीशी घालण्यासाठी प्रशासन अंतिम भूखंड 100 मधून विक्रम मिनिडोअर चालकांना हलवू पाहात आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे.
एखाद्या सर्वसामान्याने आपली इमारत बांधताना जो आराखडा नगरपालिकेत सादर केलेला असतो, त्यानुसार बांधकाम न झाल्यास सदरील इमारतीला अनधिकृत म्हणून नगरपालिका घोषित करते. मग भाजी मार्केट तथा शॉपिंग मॉलला अनधिकृत म्हणून नगरपालिका घोषित करेल का? माहितीच्या अधिकाराखाली ज्या वेळेला भाजी मार्केटचा आराखडा मागितल्यानंतरच मूळ आराखड्याची प्रत हातात मिळताच सदरील इमारतीच्या बांधकामामध्ये फेरबदल झाल्याचे दिसून येत आहे.