| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पालीतील सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा श्री जय आंबे माता ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष, जैन मंदिर पालीचे माजी विश्वस्त, शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबचे सक्रिय सदस्य विक्रमशेठ परमार यांचे रविवारी (दि. 3) रोजी वयाच्या 52 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने समस्त बहुजन समाज हळहळला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन भाऊ व चार बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने पालीत शोककळा पसरली. विक्रम परमार हे सामाजिक, धार्मिक, सेवाभावी क्षेत्रात अग्रेसर राहून काम करायचे. पीडित शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी बांधवांवरदेखील दुःखाचा डोंगर कोसळला. विक्रम परमार यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबिय, मित्रपरिवार, हितचिंतक, कार्यकर्ते शोकसागरात बुडाले. तर सामाजिक, धार्मिक राजकीय चळवळीचीदेखील मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया अंत्ययात्रेस उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिली.