विलास हरी तेंडुलकर यांचे निधन

|अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे आधारवड, संघटनेचा दीपस्तंभ, रायगड राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी अध्यक्ष, मित्राक्ष मासिकाचे संपादक, सरकारी कर्मचारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष, श्री. विलास हरी तेंडुलकरसाहेब यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 76 व्या वर्षी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय मध्ये दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११-०० वा. दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी असून रायगड जिल्ह्यातील राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक हरपला. रायगड जिल्हा राज्य शासकीय संघटनेची मोठी हानी झाली आहे. सुमारे ५० वर्षे त्यांनी सरकारी कर्मचारी संघटनेचे कार्य केले. कॉ. र. ग. कर्णिक साहेब यांचा तेंडुलकर यांच्या जीवनावर प्रभाव होता. त्यांच्या मुळे संघटनेच्या कार्यासाठी तेंडुलकर यांनी अखेर पर्यंत झोकून दिले. त्यांचे जीवन संघटनामय होते.

सरकारी कर्मचारी यांच्या सर्व आंदोलनात वि. ह. तेंडुलकर हे अग्रस्थानी असत. त्यांनी निःस्वार्थ वृत्तीने संघटनेचे कार्य केले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकरीता सातत्याने लढणारा नेता म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख होती. कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याकडे त्यांचा कल होता. अनेक सामाजिक संस्था व राजकीय नेते यांच्याशी त्यांचा स्नेह होता. विलास तेंडुलकर यांच्या निधनाने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची न भरून येणारी खूप मोठी हानी झाली आहे. अशी भावना संघटना पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version