ग्रामविकास अधिकारीच गायब! मोहपाडा ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

दाखले, विकासकामांसह नागरिकांची कामे खोळंबली

| आपटा | प्रतिनिधी |

मोहपाडा-वाशांबे ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारीपद गेल्या पंधरा दिवसांपासून रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार अक्षरशः ठप्प झाला आहे. विविध शासकीय दाखले, ज्येष्ठ नागरिकांची कामे, विद्यार्थ्यांचे शाळेचे दाखले, उत्पन्नाचे दाखले तसेच विकासकामांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दि. 8 जुलै रोजी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांची रायगड जिल्हा परिषदेमार्फत अचानक बदली करण्यात आली. मात्र, त्यांच्या जागी अद्याप नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सुमारे 70 ते 75 हजार लोकसंख्या असलेल्या मोहपाडा-वाशांबे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

ग्रामपंचायतीमध्ये दररोज विविध कामांसाठी नागरिक येत असतात. मात्र, अधिकारीच उपलब्ध नसल्याने त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. विद्यार्थ्यांचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, ज्येष्ठ नागरिकांची कामे तसेच विविध शासकीय प्रक्रियांना विलंब होत आहे. त्याचबरोबर विकासकामांबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असतानाही अधिकारी नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.

याबाबत माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला पंधरा दिवसांपासून ग्रामविकास अधिकारी नसणे ही गंभीर बाब असून, नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते, अशी भूमिका मुंडे यांनी मांडली. दरम्यान, येत्या सोमवार, दि. 27 जुलैपर्यंत मोहपाडा-वाशांबे ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह संदीप मुंडे यांनी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा खोळंबा आणखी वाढून नागरिकांच्या अडचणी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Exit mobile version