गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; आरोपी मात्र मोकाट

52 हजार रुपयांचे 1400 लिटर रसायन केले नष्ट

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दितील सुकेळी, वाघ्रनवाडीवरील डोंगराळ भागात व जंगल परिसरातील सुरु असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टी नागोठणे पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केल्या आहेत. गावठी दारु विरोधी मोहिमेचाच एक भाग म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याचे स. पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाणे अंमलदार व पथकाने रविवारी (दि.20) सकाळी धाड टाकून अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त करुन सुमारे 52 हजार 400 रूपये किंमतीचे रसायन व दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केले. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली.

दरम्यान यापूर्वीही अनेकवेळा नागोठणे पोलिसांकडून परिसरातील गावठी दारूच्या हातभट्टी नष्ट करण्यात आल्या आहेत. असे असले तरी याप्रकरणी हातभट्टी लावणारे आरोपी घटनास्थळावरून पळून जात असल्याने ते मोकाटच असतात. त्यांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्यानेच पुन्हा पुन्हा या गावठी दारूच्या हातभट्टी सुरु होत आहेत.

नागोठणे पोलिसांच्या या धाडीत सात प्लास्टिक टाक्यांमध्ये प्रत्येकी 200 लिटर असे 49 हजार रुपये किंमतीचे 1400 लिटर रसायन, प्रत्येकी 200 रुपये किमतीच्या एकूण 1400 रुपये किंमतीच्या सात प्लास्टिक टाक्या तसेच रुपये 2000 किंमत असलेली 20 लिटर तयार गावठी दारू व सर्व मुद्देमाल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने हा मुद्देमाल जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला. या मोहिमेत नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान नागोठणे पोलीस ठाणे परिसरात पोलीस पथकाने दि. 15 ऑक्टोबरपासून 6 ठिकाणी छापे टाकून 6 केसेस दाखल केल्या आहेत.

दरम्यान नागोठणे पोलिसांनी सुरु केलेल्या गावठी दारु विरोधी मोहिमेचे संपूर्ण नागोठणे विभागातील जनतेकडून स्वागत करण्यात येत असून पोलिसांनी या गावठी दारु माफियांचा कायमचा बंदोबस्त व नायनाट करुन गावठी दारुला नागोठणे विभागातून हद्दपार करुन त्रस्त झालेल्या महिला वर्गाचे आशीर्वाद मिळवावेत व त्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.

Exit mobile version