कृषीवल इम्पॅक्ट! वरवठणे येथे गावठी दारू जप्त

नागोठण्याचे प्रभारी अधिकारी ॲक्शन मोडवर

| नागोठणे | महेश पवार |

नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारच्या अवैध धंद्यांसह अवैध गुटखा व सुगंधी पान मसाला विक्री सुरू होती. याबाबतचे वृत्त दैनिक ‌‘कृषीवल‌’ वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन कुलकर्णी ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे शहर व परिसरातील अवैध गावठी दारू, गुटखा व इतर अवैध धंदे प्रकरणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच, बेशिस्तपणाच्या इतर प्रकरणातील पोलिसांनाही सक्त तंबी देण्यात आल्याची माहिती प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.

नागोठणे परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. याठिकाणी अवैध गावठी दारू, गुटखा व पानमसाल्यासारखे पदार्थांची सर्रास विक्री सुरू असून त्याला मोठ्या प्रमाणात तरूण मंडळी बळी पडत आहे. त्यामुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबतचे वृत्त ‌‘कृषीवल‌’ वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची तात्काळ दखल घेत नागोठण्याचे सहाय्यक पोली निरिक्षक सचिन कुलकर्णी यांनी येथील विविध प्रकारच्या अवैध धंद्याची शोधमोहीम सुरू केली आहे. त्याच्या पथकाकडून नागोठणे जवळील वरवठणे येथे अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिले विरोधात कारवाई केली आहे. त्या महिलेकडून सुमारे 1 हजार रुपये किंमतीची 10 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस हवालदार अथर्व पाटील, पोलीस शिपाई सौरभ पाटील, महिला पोलीस हवालदार साक्षी पाटील व दोन होमगार्ड सहभागी झाले होते.

याशिवाय नागोठण्याचे पोलीस उपनिरीक्षक जि. डी. पावरा, उपनिरीक्षक सुरज पाटील, हवालदार महेश लांगी, शिपाई स्वप्नील भालेराव, बळी पुट्टेवाड यांच्या पथकाकडून अवैध गुटखा, सुगंधी पान मसाला प्रकरणी नागोठण्यातील व परिसरातील सर्व टपरीधारक व किराणा माल दुकानदारांची तपासणी करण्यात आली. त्यांची कसून तपासणी करण्यात आली असून कोठेही गुटखा मिळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन कुलकर्णी यांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत असून ‌‘कृषिवल‌’चे देखील सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version