मुख्यालयी राहात नसल्याने कामाचा खोळंबा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
तालुक्यातील चंदरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक हे चंदरगाव पंचक्रोशीत राहात नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्या कामाचा खोळंबा होतो. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकांनी पंचक्रोशीत राहावे या मागणीसाठी मनसे पदाधिकारी व नागरिकांनी त्यांच्याविरोधात पाली पंचायत समिती कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. याआधी मनसे पदाधिकारी व ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत तक्रारीचे निवेदन दिले आहे. नागरिक कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात येतात त्यावेळेस सरपंच व ग्रामसेवक उपस्थित नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत व त्यांना मानसिक त्रास होतो. त्यांच्या कामाचा व पैशाचा अपव्यव होतो, असे तक्रारी निवेदनात म्हटले आहे. ठिय्या आंदोलनावेळी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, मनसे सुधागड तालुका उपाध्यक्ष तसेच मनसे माथाडी कामगार सेना उपचिटणीस महाराष्ट्र राज्य केवल गणपत चव्हाण, चव्हाणवाडी शाखा अध्यक्क्ष परेश वनगले, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेवकांना नोटीस सदर आंदोलनानंतर सुधागड गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी ग्रामसेवकांना नोटीस काढली आहे. ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहणेबाबत या कार्यालयाकडून यापूर्वी लेखी स्वरूपात सूचना दिल्या आहेत. तुम्ही मुख्यालयी राहात नाही याचा खुलासा मला चार दिवसांत सादर करावा. तसेच ग्रामसेवक कामकाजाचा बोर्ड ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठळक ठिकाणी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सरपंचांना सूचना गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी सरपंचांना लेखी सूचना दिल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, सरपंच हे लोकसेवक आहेत नागरिकांच्या कामासाठी आपल्या कामाचा दिवस ग्रामपंचायत कार्यालयासाठी ठरवून त्याची नोटीस बोर्डावर प्रसिद्ध द्यावी.