प्रकल्प हद्दपार करण्यासाठी जांभिवली ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
| रसायनी | वार्ताहर |
मुंबई महापालिकेचा गोवंडी येथील जैववैद्यकीय प्रक्रिया प्रकल्प पाताळगंगा एमआयडीसी हद्दीतील जांभिवली भागात उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला पंचक्रोशीतील नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. या प्रकल्पाला हद्दपार करण्यासाठी गावबैठका सुरू झाल्या आहेत. काही झाले तरी जांभिवली परिसरात हा प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. याअगोदर याच लगतच्या परिसरातील बोरिवली येथे सदर प्रकल्प न येण्यासाठी जसे आंदोलन केले, तसेच आंदोलन जांभिवली येथून प्रकल्प हद्दपार करण्यासाठी करणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कचर्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गोवंडीत मुंबई महापालिकेच्या मदतीने प्रक्रिया केंद्र उभारले. मात्र, यातून मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करत गोवंडीतील रहिवाशांनी आणि लोकप्रतिनिधींनीही त्याला तीव्र विरोध केला. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तसेच महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या.
हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने 19 सप्टेंबर 2023 रोजी जैववैद्यकीय प्रक्रिया केंद्राच्या ज्वलनभट्टीना भाग दोन वर्षाच्या आत स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे केंद्र एमआयडीसीने उपलब्ध करून दिलेल्या रसायनी येथील पाताळगंगा बोरिवली गाव एमआयडीसी हद्दीत स्थलांतरित करण्याने निश्चित करण्यात आले होते. मात्र, तेथील स्थानिकांनीही या केंद्राला तीव्र विरोध केला. यासंदर्भात बैठकाही झाल्या. मात्र, आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत स्थानिकांनी विरोध कायम ठेवत आंदोलनेही केली.
यानंतर, अखेर आता फेब्रुवारीमध्ये एमआयडीसीने पाताळगंगा बोरिवली गावाऐवजी जांभिवली औद्योगिक केंद्र येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. अद्याप केंद्राचे स्थलांतर झालेले नाही. प्रक्रिया केंद्र काम पाहणार्या कंपनीला नवीन जागा उपलब्ध केल्याचे अधिकारपत्र देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता केंद्राच्या स्थलांतराची पुढील कार्यवाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रकिया केंद्र प्रकल्प पाहणारी कंपनी करणार असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नागरिक सरसावले असून, जाहीर निषेधाचे बॅनर सोशल मीडियावर झळकत आहेत.
रसायनी-पाताळगंगा पंचक्रोशीतील सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आपले मतभेद बाजूला ठेवून आपल्या परिसराच्या भल्यासाठी एकजुटीने या जीवघेण्या प्रकल्पाला विरोध करणे गरजेचे आहे‘ असे मत अतिरीक्त पाताळगंगा संघर्ष कृती समिती चावणे यांच्यासह परिसरातील तफ़्ज्ञ जाणकारांनी व्यक्त केले आहे.