निवारा शेडसाठी ग्रामस्थ एकवटले

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
बोर्लीपंचतन येथील बस स्थानकाच्या निवारा शेडअभावी पंचक्रोशीतील प्रवासी व शाळा, कॉलेजला येणार्‍या विद्यार्थ्यांची गेले दीड वर्ष होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच याठिकाणी निवारा शेड उभारली जाणार आहे.

दरम्यान, सरपंच ज्योती परकर यांचा याकामी असलेला सकारात्मक दृष्टीकोन या सर्व बाबींचा विचार करता सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या जागेत निवारा शेड उभारण्यासाठी ग्रामपंचायतीला दिलेली लेखी परवानगी यामुळे आता लवकरात लवकर निवारा शेड उभी राहण्यासाठी ग्रामस्थांच्या राजकारणविरहित प्रयत्नांना सर्व राजकीय पक्षांचासुध्दा पाठिंबा मिळत असल्याने कोणताही अडथळा न येता प्रवाशांची बस स्थानकाच्या निवारा शेडची प्रतीक्षा संपेल असा आशावाद ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. आपण ग्रामस्थांसोबत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुकूमार तोंडलेकर व नंदकुमार पाटील यांनी सांगितलं. त्याबरोबरच गणेश पाटील, चंद्रकांत धनावडे व प्रदीप खोपकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या भूमिका मांडल्या.

Exit mobile version