| दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातील बसस्थानकाचा प्रश्न प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दोन वर्षांनी सुटत आहे. मात्र, आता नव्याने येत असलेल्या अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी आता ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. या नूतन बसस्थानकाला निधी मिळणार असून या निवारा शेडची उभारणी जुन्याच ठिकाणी मोकळ्या भुखडांत करण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले आहेत.
बोर्लीपंचतन शहरात असणारे बस स्थानक दोन वर्षांपूर्वी अतिक्रमणमध्ये हटवण्यात आलं. त्यामुळे येथे येणार्या प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना सतत भेडसावत होता. त्यामुळे बोर्ली शहराला बसस्थानक मिळावे यासाठी ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. मात्र, त्याच जागेत निवारा शेड होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी तसेच एसटी महामंडळचा समन्वयाचा अभाव अशा शुल्लक कारणांमुळे येथील प्रवाशांना उन्हाळी पावसाळी प्रवासात हाल सोसावे लागले. यानंतर सध्या नवीन येणारे अडथळे दूर करण्यासाठी रविवारी सायंकाळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा घेतली.