22 जानेवारीला जेएनपीए समुद्र चॅनेल बंद आंदोलनाचा इशारा
| उरण | वार्ताहर |
40 वर्षे उलटूनही पुनर्वसन झाले नसल्याने हनुमान कोळीवाडा (शेवा कोळीवाडा) ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे संतप्त हनुमान कोळीवाडा (जुना शेवा कोळीवाडा) ग्रामस्थांनी नवीन वर्षाच्या अखेरीस 22 जानेवारी रोजी जेएनपीएचे समुद्र चॅनेल बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येक वेळी पुनर्वसनाच्या नावाखाली प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्यात आली असून, प्रत्येक वेळी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन, मात्र अंमलबाजवणी झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुनर्वसन न झाल्याने 256 कुटुंब आले रस्त्यावर आली असून, पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यात केंद्र व राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जेएनपीए व्यवस्थापनाने शेवा बेटाच्या सभोवतालच्या मासेमारी जमिनीत प्रकल्पासाठी सन 1984 साली 146 हेक्टरचा भराव केला आहे. तसेच शालोबर्थसाठी 30 हेक्टरचा भराव, एनएसआयसीटी प्रकल्पासाठी 30 हेक्टरचा भराव, बल्क टर्मिनल टू कंटेनर टर्मिनलसाठी 18 हेक्टरचा भराव, एनएसआयजीटी 330 मीटर कंटेनर टर्मिनलसाठी 27.5 हेक्टरचा भराव, बीएमसीटीपीएल फेज 1 साठी 90 हेक्टरचा भराव,पोर्ट बर्थसाठी 39 हेक्टरचा भराव, बीएमसीटीपीएल च्या रस्त्यासाठी 19.5 हेक्टरचा भराव, टैंक फार्मसाठी 600 हेक्टर भराव, पार्किंगसाठी 500 हेक्टर भराव, जेएनपीटी सेझ साठी 300 हेक्टर भराव, बीएमसीटीपीएल फेज 2 साठी 110 हेक्टर भराव, रस्ते रुंदीकरणासाठी भराव असे मासेमारी जमिनीत भराव करून तयार केलेल्या जमिनीच्या समोर मासेमारी जमिनीत सुमारे 6 किलो मीटर लांबीचे माल चढ उतार करण्यासाठी धक्के व त्या धक्यावरून जहाजात माल भरण्यासाठी त्या धक्क्यांना जागोजागी अनेक पोच रस्ते बांधले आहेत. आणि धक्क्यांचे समोर मासेमारी जमिनीत मालवाहू जहाजे लावण्यासाठी व फिरवण्यासाठी खुदाई करून खोली केलेली आहे. यामुळे मच्छिमारांवर बेकारीची वेळ आली आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारला काहीच देणे-घेणे नाही. याविरोधात ग्रामस्थ आक्रमक असून, दि. 22 जानेवारी 2025 रोजी जेएनपीएचे समुद्रमार्गे चॅनेल बंद आंदोलन करणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यासाठी कोकणातील सर्व संस्थांनी बोटी/होड्या घेवून यावे आणि कोळी समाजाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ तसेच शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.