खोंडकोल आदिवासी वाडीतील ग्रामस्थ तहानलेले

गावाला टँकरने करावा लागतो पाणीपुरवठा

| तळा | वार्ताहर |

मौजे खोंडकोल आदिवासी वाडी येथे पाण्याची समस्या गंभीर झाली असून पाण्याची तहान भागविण्यासाठी येथील ग्रामस्थांना पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ आली आहे. रोवला ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या खोंडकोल आदिवासी वाडीतील ग्रामस्थ बोरवेल व गावात असलेल्या विहिरीच्या सहाय्याने आपली पाणी समस्या दूर करतात. परंतु गेल्या महिनाभरापासून बोरवेलला पाणी येत नसल्याने तसेच विहिरीने तळ गाठलयाने गावातील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. जवळपास 25 घरांची वस्ती असलेल्या या वाडीतील ग्रामस्थांना आपली तहान भागविण्यासाठी एक दिवस आड करून स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. पावसाळा सुरू व्हायला अद्याप पंधरा ते वीस दिवस बाकी असल्याने पावसाळा सुरू होईपर्यंत येथील ग्रामस्थांना टँकरने पाणी मागवून आपली तहान भागवावी लागणार आहे.

आमच्या खोंडकोल आदिवासी वाडीमध्ये 25 घरांची वस्ती असून आम्हाला बोरवेल आणि विहिरीच्या सहाय्याने पाणी पुरवठा होतो. मात्र, हे दोन्ही स्रोत अटल्यामुळे आम्हाला एक दिवस आड करून स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत.

गणेश पवार,
ग्रामस्थ खोंडकोल
आदिवासीवाडी
Exit mobile version