अदानींच्या वीज वाहिनीला ग्रामस्थांचा विरोध

टॉवर लाईनसाठी वृक्षतोडीस परवानगी देऊ नका; बाबू घारे यांचे उपवन संरक्षकांना निवेदन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातून प्रस्तावित वीज वहन प्रकल्पासाठी अदानी समूहाकडून उभारण्यात येणाऱ्या टॉवर लाईनमुळे जंगल, शेती आणि पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी वन विभागाकडे तीव्र आक्षेप नोंदविला आहे. जंगल क्षेत्रातून आणि खासगी शेतजमिनींतून वीज वाहिनी टाकण्यासाठी कोणतीही परवानगी देऊ नये, तसेच वृक्षतोडीवर तातडीने नियंत्रण आणावे, अशी मागणी त्यांनी जिल्हा उपवन संरक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

घारे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कर्जत तालुका हा समृद्ध वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यटनासाठी ओळखला जातो. प्रस्तावित टॉवर लाईन आर्ढे, माले, साळोख, आंबोट, अंजप, पाली, पोटलं, वैजनाथ, भिवपुरी, चिंचवली, कडाव, जांभवळी, कराळेवाडी, भालीवडी, गोलवाडी, मालेवाडी, टाकवे, मार्केवाडी, चांधई, बारणे, गणेगाव-चिंचवली आदी गावांमधून जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या मार्गातील अनेक भाग सह्याद्री पर्वतरांगांतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (इको-सेन्सिटिव्ह) क्षेत्रात येत असून, मोठ्या प्रमाणावर खासगी मालकीच्या शेतजमिनी आणि वनक्षेत्र यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांची संमती आणि आवश्यक कायदेशीर परवानग्या घेतल्याशिवाय झाडांची तोड, फांद्या छाटणे किंवा अन्य कोणतेही काम करण्यात येऊ नये, अशी भूमिका घारे यांनी मांडली आहे.

कर्जत तालुक्यात आधीच विविध कारणांमुळे वृक्षतोड वाढत असल्याचा दावा करत त्यांनी वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडविणाऱ्या कोणत्याही कामांना आळा घालून जंगल आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, टॉवर लाईनमुळे अनेक गावांतील शेतीक्षेत्र बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे वन विभाग या निवेदनावर कोणती भूमिका घेणार याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.

वन विभागाला साकडे
सर्व रोखण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी अलिबाग वनविभाग अधिकारी यांना पत्र देण्यात आले मात्र यावर वनविभाग लक्ष देणार आणि चौकशी करावी अशी मागणी आहे.
Exit mobile version