रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन
| कर्जत | प्रतिनिधी |
कोरोना महामारीच्या संकटात महाराष्ट्रातील 85 हजार पुरुष मृत्युमुखी पडले. त्यामुळे विधवा झालेल्या माझ्या माय-भगिनींचे कपाळावरील कुंकू पुसले गेले. मात्र, त्या विधवा झालेल्या भगिनींना संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत होणार्या हळदीकुंकवाच्या समारंभाला आवर्जून बोलवून त्यांना वाण देऊन हळदीकुंकू द्या, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी येथे केले.
कर्जत तालुक्यातील वासराच्या खोंड्यात असलेल्या सांगवी गावातील सोमजाई मातेच्या उत्सवाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केले होते. यावेळी महिलांसाठी क्रांती नाना मालेगावकर प्रस्तुत ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ आणि हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अभिनेत्री उर्मिला कोठारे, साक्षी गांधी, दिव्या पुगावकर, रेश्मा शिंदे यांची आवर्जून उपस्थिती होती. याप्रसंगी सुमारे पंधरा हजार महिलांनी सहभाग घेतला होता. माजी आमदार सुरेश लाड आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांनी सकाळीच सोमजाई मातेचे दर्शन घेतले.
सायंकाळी झालेल्या विशेष कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे, आ. सुनील शेळके, आ. अदिती तटकरे, सुरेश टोकरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंढे, माजी सभापती तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष शरद लाड, भगवान भोईर, भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, पंचायत समिती माजी सदस्य भरत भगत, नरेश मसणे, नितीन सावंत, संतोष भोईर, रंजना धुळे, सरपंच नमिता घारे, प्रमोद देशमुख, रणजीत जैन आदी उपस्थित होते. माजी सरपंच मधुकर घारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुधाकर घारे यांनी सोमजाई मातेच्या उत्सवानिमित्त आम्हाला महिलांना हक्काचे व्यासपीठ देण्याची संधी मिळते. गेली 12 वर्षे आम्ही हा उत्सव करीत असतो. दरवर्षी महिला भगिनींचा सहभाग वाढत जात आहे. त्यामुळे मनस्वी समाधान वाटते, असे स्पष्ट केले. याप्रसंगी राम राणे, उमेश गायकवाड, संदीप भोईर, दिलीप ताम्हाणे, रमेश मते, बाबू घारे आदींसह कर्जत, खालापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.