स्थलांतरास ग्रामस्थांचा तीव्र विरोध
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणी आमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या इमारतीत स्थलांतरित करण्याच्या हालचालींमुळे नागोठण्यात संतापाची लाट उसळली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही नसताना आरोग्य केंद्र भाड्याच्या जागेत हलविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील पत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून, रोहा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुप्रीम पेट्रोकेम कंपनीकडे जागा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासन स्तरावर स्थलांतरासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी नाही, मात्र भाड्यासाठी पैसे आहेत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात आर्थिक साटेलोट्याचीही चर्चा नागोठण्यात रंगू लागली आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक व उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवित आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. शुक्रवारी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीत त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता नाईक यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर, शबाना मुल्ला, ज्योती राऊत यांच्यासह ग्रामस्थ व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता स्थलांतराचा निर्णय घेणे चुकीचे आहे. नागोठणे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजूबाजूच्या गावांतील, आदिवासी वाड्यांतील रुग्ण, गरोदर माता व बालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच खासगी वाहनांचा खर्चही नागरिकांवर पडणार आहे.
दरम्यान, वाढता विरोध लक्षात घेता रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका साळुंके यांनी नागोठणे ग्रामपंचायतीत भेट देऊन सरपंच सुप्रिया महाडिक व उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यासोबत पर्यायी जागेबाबत चर्चा केली. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.







