खंडित वीज पुरावठ्याबाबत ग्रामस्थ एकवटले

महावितरणला दिले निवेदन

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्याबाबत सर्वच गावातील ग्रामस्थ एकवटले असून, त्यांनी याबाबत महावितरण विभागाला निवेदन दिले आहे.

तळा तालुक्यातील तळेगाव, बोरीचा माळ, वांजळोशी, चरई खुर्द, पन्हेळी, कासेखोल, गणेशनगर, चोरीवली, चरई बुद्रुक, पाचघर, अडणाले, भांनग, उसर, कलमशेत, काकडशेत, दहिवली आदी गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या गावांतील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गावांची पाणीपुरवठा योजना ही विजेवर अवलंबून असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर या ठिकाणी पाण्याची मोठी समस्या निर्माण होते.

याआधीदेखील ग्रामस्थांतर्फे महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले असूनही त्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हे शेवटचे निवेदन ग्रामस्थांकडून देण्यात येत असून, या नंतरही वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ग्रामस्थांतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे. याप्रसंगी शिवसेना शिंदेगट तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ, गणेश राणे, राजेश शिंदे, सुचित पतारे यांसह ग्रामीण भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version