नेरळ परिसरातील गावे अंधारात

ग्रामस्थ धडकले महावितरण कार्यालयावर

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ परिसरातील दामतजवळ रविवारी रात्री आलेल्या वादळी वार्‍यामुळे विजेच्या खांबावरील वीज वाहिन्या खाली कोसळल्या होत्या. त्यामुळे त्या वाहिनीवर अवलंबून असलेली चार गावे अंधारात गेली होती. दरम्यान, वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेलू गावातील तरुण मंडळींनी थेट नेरळ येथील महावितरण कार्यालय गाठले होते. मात्र, नेरळ येथील कार्यालयाला चक्क कुलूप असल्याने वीज ग्राहक आणखी संतप्त झाले होते.

नेरळ येथील वीज उप केंद्रातून शेलू गावाकडे वीज जाते, त्याचवेळी शेलू भागातून ही वीज वाहिनी बांधीवली आणि उल्हास नदीच्या पलीकडे असलेल्या बिरदोले गावाकडे जाते. कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील दामत पासून शेलू भागात रविवारी रात्री वेगाने सुरू असलेल्या वादळी वार्‍याने अनेक वीज वाहिन्या तुटून जमिनीवर पडल्या. मुख्य वीज वाहिनी असल्याने दामत, शेलू, बांधीवली आणि बिरदोले येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर दोन दिवस या चारही गावात कमी दाबाने वीज पुरवठा तसेच वीज पुरवठा सातत्याने खंडित होण्याचे प्रकार सुरू होते. या सर्व प्रकाराने या चारही गावातील ग्रामस्थांची झोप उडून गेली होती. त्यात महावितरण कार्यालयाचे कर्मचारी स्थानिक वीज ग्राहकांचे मोबाईल फोन वरून येणारे कॉलवर बोलत नव्हते. तर, महावितरणचे नेरळ येथील सहायक अभियंता प्रशांत मोडक आजारी असल्याने त्यांच्या जागी प्रभारी म्हणून नियुक्त केलेले अभियंता कुंटे हे देखील वीज ग्राहकांच्या तक्रारींना सामोरे जात नव्हते. शेवटी मंगळवारी (दि.2) शेलू गावातील नागरीक नेरळ येथील महावितरण कार्यालयात पोहोचले. परंतु, त्यावेळी महावितरण कार्यालयात कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हता. त्यामुळे विज ग्राहक आणखी संतप्त झाले. यावेळी कृष्णा बोराडे, अक्षय हिसाळगे, महेश खारीक, रवी मसने, मनोहर मसने, जयराम मसने, दिलीप मसने, संदेश बागडे, मनोज तरे, प्रकाश भगत, विलास मसने, सिद्धी हिरेमठ, अनंता मसने, श्रीकांत मसने, सतीश खारीक, हर्षल मसने, निलेश मसने, मनीष तरे, दयानंद खांडपेकर हे वीजधारक उपस्थित होते.

महावितरणचे वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली असता काम होईल असे सांगण्यात आले. परंतु, दोन दिवस कोणत्याही प्रकारचे काम आम्हाला दिसून आले नाही. ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर यापुढे शेलु गावातील सर्व वीजधारक महावितरणच्या विरुद्ध उपोषणाला बसतील.


संदेश बागडे,
ग्रामस्थ
Exit mobile version