Water Scarcity: पाऊस पडूनही गावे तहानलेलीच

पावणे दोन लाख नागरिकांंना 85 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्ह्यामध्ये पावसाने सोमवारपासून पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. मंगळवारीदेखील जिल्ह्यात अनेक भागात मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसामुळे नदी, विहिरींसह शेतही पाण्याने भरली. शेतकऱ्यांना पावसाने दिलासा मिळाला आहे. पाऊस पडूनही जिल्ह्यातील पावणे दोन लाख नागरिक मात्र तहानललेच असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील 346 वाड्या आणि 115 गावांमध्ये 85 टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरुच असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

प्रदीर्घ कालावधीनंतर पावसाने सोमवारी 22 जूनपासून हजेरी लावली. त्यानंतर भातपेरणीची कामे वेगात सुरु झाली. मात्र, 25 नंतर पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सोमवारपासून सुरुवात केली. हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस सोमवारी दिवसभर सुरुच राहिला.

मंगळवारीदेखील पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यामध्ये एकूण 996 मि.मी. इतका पाऊस पडला असून, सरासरी 62.25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नदी, विहिरी पाण्याने भरल्या. नद्या पाण्याने ओसंडून वाहू लागल्या. कोरड्या पडलेल्या धरणांमध्ये पाणी साचू लागले. जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये आता 22.20 टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे. पाऊस पडूनही जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट कायम असल्याची माहिती समोर आली आहे. अजूनही एक ते तीन दिवस आड पाणीकपात केली जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, मूरूड तळा या तालुक्यातील 461 ठिकाणी पाण्याचा दुष्काळ आहे. त्यामध्ये 115 गावे आणि 346 वाड्यांचा समावेश आहे. या टंचाईग्रस्त गावांमध्ये 85 टँकरद्वारे पाणीपुरवठा प्रशासनाकडून केला आहे. जिल्ह्यातील एक लाख 81 हजार 732 नागरिकांना पाण्याचा दुष्काळ भर, पावसात निर्माण झाला असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

नऊ धरणे कोरडीच
पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणारी रायगड जिल्ह्यातील 28 धरणे आहेत. या धरणांद्वारे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पावसाने उशीर केल्याने धरणांनी तळ गाठला होता. पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु, जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील फणसाड, सुधागडमधील ढोकशेत या धरणांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. सुधागडमधील घोटवडे धरणात सहा टक्के, उन्हेरेमध्ये नऊ टक्के, महाडमधील कोथुर्डेमध्ये दहा टक्के, पनवेलमधील बामणोलीमध्ये दोन टक्के, खालापूरमधील डोणवतमध्ये अकरा टक्के आणि उरणमधील पुनाडेमध्ये फक्त सातच टक्के जलसाठा आहे. त्यामुळे ही नऊ धरणे कोरडी अशी परिस्थिती भरपावसात असल्याची माहिती समोर येत आहे.
चार दिवस अतिवृष्टीचा इशारा
रायगड जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. हा पाऊस पुढील चार दिवस असाच सुरु राहणार आहे. मात्र, आगामी या कालावधीत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दोन जुलैला रेड अलर्ट इशारा आहे. अन्य दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत विनाकारण घराबाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Exit mobile version