विमला तलावाला नशेबाजांचा विळखा

| उरण | प्रतिनिधी |

उरण शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या विमला तलाव परिसराला सध्या प्रेमीयुगुलांच्या उघड-उघड गैरवर्तनासह नशेबाजांचा विळखा पडल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. तलाव परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, डबे आणि इतर साहित्य पडलेले आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकारांबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विमला तलाव परिसरात काही प्रेमीयुगुलांकडून सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. दुसरीकडे तलाव परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि डबे आढळत असल्याने येथे रात्रीच्या वेळी मद्यप्राशन अथवा नशेचे प्रकार होत असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

विशेषतः एकट्या ये-जा करणाऱ्या मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात छेडछाडीचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी व चर्चा असल्याने नशेच्या अवस्थेत असलेल्या व्यक्तींकडून महिलांना त्रास होण्याची भीती महिला वर्गातून व्यक्त होत आहे. विमला तलाव परिसरातील गैरप्रकारांबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांनीही या समस्येला वाचा फोडली आहे. मात्र तक्रारी आणि वृत्त प्रसिद्ध होऊनही परिस्थितीत ठोस बदल होत नसल्याने प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील हा परिसर जर नशेबाज आणि टवाळखोरांसाठी मोकळे मैदान बनत असेल, तर ही उरणकरांसाठी गंभीर बाब आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता विमला तलाव परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, रात्रीच्या वेळी विशेष तपासणी करावी, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन, महिलांना त्रास देणे किंवा गैरवर्तन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version