। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिका हद्दीतील विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आणि परिसरात प्रचंड धुळ साचली होती. याबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर मुकादम कासरे यांनी स्वतः कचरा साफ करून घेतल्याने परिसर स्वच्छ दिसत आहे. परंतु, विमला तलावाचा कोसळलेला कठडा दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने जेष्ठ नागरिक व पादचारी यांना मॉर्निंग वॉकसाठी गैरसोय होत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील विमला तलाव हे लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना फायद्याचे ठरत आहे. लहान मुले खेळण्यासाठी तर तरुणांपासून वयोवृद्धापर्यंत सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी येत असतात. याच तलावामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर धुळीचे तसेच परिसरात पालापाचोळ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. दरम्यान, याबाबत या ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त आलेले माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरल्यानंतर प्रशासनाने त्वरीत साफसफाई केली. परंतु, तलावाच्या एका बाजूच्या तुटलेल्या कठड्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तुटलेल्या कठड्यामुळे चालण्यासाठी येणार्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे. याबाबत आवाज उठवूनही 10 ते 15 दिवसांचा अवधी उलटूनही नगरपालिका प्रशासनाकडे लक्ष देण्याची सवड नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, या तलावामधील खेळण्याची दुर्दशा झाली आहे.