रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा
। उरण । वार्ताहर ।
मुंबईचे नवे उपनगर बनलेल्या उरणच्या द्रोणागिरी नोड मधील रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त असून या इमारतींना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ सिडकोच्या पाणी पुरवठा विभागावर आली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये नैराश्याची भावना व्यक्त होत आहे.
मुंबई शहराची वाढती लोकसंख्या, वाढती महागाई यामुळे मुंबई शहरात राहणे सर्वसामान्य माणसाला पडवत नाही. त्यात मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उरण तालुका हा अटल सेतू आणि उरण नेरुळ लोकल रेल्वेमुळे काही अंतरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नागरिकांनी उरणला सर्वाधिक पसंती दर्शविली असल्याने सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोड परिसर झपाट्याने विकसित होत आहे. या परिसरात उंच इमारती उभ्या राहत असल्याने या इमारतीमधील रहिवाशांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोकडून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, या जलवाहिनीतून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. एकंदरीतच इमारतीमधिल रहिवाशांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या द्रोणागिरी नोड परिसरातील रहिवाशांना सिडकोच्या हेटवणे धरणातून नवीमुंबई शहराकडे जाणार्या चिरनेर गावातील जलवाहिनीतून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.