। नेरळ । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या तांबडी गावाला कोणतीही ओळख नाही. मात्र, त्याच तांबडी गावामध्ये एका लहानगीला कुष्ठरोगी ठरवले आणि त्यात तिचा नाहक बळी गेला. त्यांनतर हेच तांबडी गाव प्रकाशात आले आहे. आजूबाबाजूला दगड खाणी असलेल्या तांबडी आदिवासी वाडीमध्ये सरकारी अधिकार्यांच्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. मात्र, खुशबूमुळे प्रकाशात आलेल्या तांबडी गावाबद्दल सरकारी अनास्था कायम आहे.
पेण शहराची हद्द संपली की बोरगाव ग्रामपंचायतीची हद्द सुरु होते. शहराला लागून असलेल्या या ग्रामपंचायत मधील सर्व नऊ आदिवासी वाड्या डोंगरावर वेगवेगळ्या भागात वसल्या आहेत. तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता देखील नाही. तब्बल तीन दगड खाणी असलेल्या या डोंगरात दिवसरात्र दगडांची ने-आण सुरु असते. दरम्यान, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरवणे यांच्या दुर्लक्षामुळे एका नऊ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा जीव गेला असल्याचे आरोप खुशबूच्या कुटुंबाकडून केले जात आहेत. मात्र, या प्रकाराची माहिती माध्यमांना झाल्यावर सरकारी अधिकार्यांच्या गाड्यांना दुर्गम भागातील तांबडी आदिवासी वाडी दिसून लागली आहे. अनेक अधिकार्यांच्या फेर्या तांबडीची अवघड चढन चढताना दमछाक होत असून त्यानिमित्ताने बोरगाव ग्रामपंचायत मधील हि वाडी प्रकाशात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पाठराखण करण्यासाठी प्रकल्प अधिकार्यांनी चक्क खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांना पैशाचे आमिष दाखवत खुशबूच्या मृत्यूची किंमत मोजत असल्याची चर्चा स्थानिकांत होत आहे. तसेच, या प्रकरणा संदर्भात अद्याप कोणत्याही अधिकार्यावरती कारवाई किंवा चौकशी करण्यात आली नाही ही बाब अत्यंत खेदाची व निंदनीय आहे.