पाण्याला खाज येत असल्याने आजाराची लक्षणे
। नेरळ । प्रतिनिधी ।
पुण्यातील आंध्रा धरणाचे पाणी कर्जत तालुक्यातील पेज नदीत आणि नंतर उल्हास नदीतून वाहत पुढे ठाणे जिल्ह्यात जाते. याच उल्हास नदीत आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे उल्हास नदी प्रदूषित होत आहे. दरम्यान, उल्हास नदीच्या पाण्यावर बसणारा हिरवा तवंग दिसून येऊ लागला आहे. परिणामी त्या हिरव्या पाण्यामुळे शरीराला खाज येत असून, अशा दूषित पाण्यामुळे आजार होण्याची शक्यता बळावली आहे. यापूर्वी या जलपर्णी मे महिन्यात उल्हासनदीच्या पाण्यातून वाहत जाताना निदर्शनास येत होत्या. मात्र, मागील दोन वर्षांपासून जानेवारी महिन्यातच उल्हास नदीतून जलपर्णी वाहत जाताना दिसत आहेत.
कर्जत मधून वाहणार्या उल्हासनदीला सध्या जलपर्णीचा विळखा बसला आहे. शहरातील नागरी वस्तीतली सांडपाणी वाहून नेणारी गटारे थेट उल्हासनदीमध्ये सोडण्यात आली आहेत. त्यामुळे, पाणी प्रदूषित होऊन त्यावर जलपर्णी उगवत आहे. याचा प्रत्यय कर्जत-मुरबाड रस्त्यावर असलेल्या पुलावरून जाताना येत आहे. कारण काही महिन्यांपासून कर्जत शहराच्या सभोवताली उल्हासनदीमध्ये असलेले पाणी हिरवेगार बनले आहे. मात्र, ही समस्या फक्त कर्जत शहारतील सांडपाणी उल्हासनदीत सोडल्यामुळे निर्माण झालेली नाही. तर, गेल्या काही वर्षात सातत्याने होत असलेल्या कर्जत तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीपात्र परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे होत असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.
कर्जत परिसरात अनेकदा या जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, नदीपात्रातून काढलेली जलपर्णी बाहेर न टाकता पुन्हा नदीपात्रातच टाकली जाते. त्यामुळे ही जलपर्णी पुढे वाहत जाऊन नेरळ, शेलू, वांगणी आदी परिसरातील नदी पत्रातील पाणी दूषित करते. तसेच, पुढे आंबिवली येथून बारमाही वाहत्या बनलेल्या उल्हासनदीतुन तरंगत ठाणे जिल्ह्याकडे जाताना दिसत आहेत. त्यामुळे, उल्हास नदीचे पाणी प्रदूषित करणार्या जलपर्णींच्या उगम स्थानांपैकी एक नेरळ गाव असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
पाणी परीक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय
कर्जत शहरातील आणि परिसरातील सांडपाणी उल्हासनदीमध्ये गेल्यानंतर जलपर्णींच्या संख्येत वाढ होते. हे हिरवेगार तवंग बघून उल्हास नदी प्रदूषित झाली असल्याचा निष्कर्ष निघत आहे. हि समस्या केवळ सांडपाण्यामुळे निर्माण झाली असल्याचा दावा करत सगुणाबाग या कृषी पर्यटन केंद्राजवळील नदीच्या पात्रातील पाणी मुंबई येथे परीक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी पर्यावरण प्रेमी आणि उल्हास नदी जल संवर्धन समिती यांच्याकडून देखील या तवंगांबाबत विचारविनिमय सुरु आहे.
उल्हास नदीच्या पाण्यावर अर्धा कर्जत तालुका आणि पुढे ठाणे जिल्ह्यातील कल्याण पर्यंतचा भाग अवलंबुन आहे. येथील बहुतांश लोक हे पाणी पिण्यासाठी वापरत असतात. परंतु, या दूषित हिरव्यागार पाण्यामुळे सर्वांच्या पोटात धस्स झाले आहे. कारण नदीचे पाणी हिरवे होण्याबरोबरच त्या पाण्याला चिकटपणा देखील आला आहे. दुसरीकडे उल्हास नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्यांच्या शरीरावर खाज सुटण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे नदीमध्ये पोहायला जाणार्यांची संख्या कमी झाली आहे.
स्थानिक ग्रामस्थ,
नेरळ