विनेशने मिळवल पॅरिस ऑलिंपीकचे तिकिट

अंशू मलिक व रितिका याही पात्र

। बिश्केक । वृत्तसंस्था ।

कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या विनेश फोगाटने शनिवारी (दि.20) बिश्केक येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत 50 वजन गटात पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. विनेशशिवाय अंशू मलिकने 57 किलो आणि रितिकाने 76 किलो गटात ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.

विनेशने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या लॉरा गनिक्याजीचा 10-0 असा पराभव करून ऑलिम्पिक कोटा मिळवला. तीने लॉराविरुद्धचा सामना 4 मिनिटे 18 सेकंदात तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे जिंकला. विनेशने सलग तिसर्‍या ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवला आहे. तिने 2020 टोकियो आणि 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी कोटा देखील मिळवला आहे. सलग तीन ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

पंघल आणि फोगाट व्यतिरिक्त भारताच्या अंशू मलिक (57 किलो), रितिका (76 किलो) यांनीही ऑलिम्पिक कोटा मिळवला. रितिकाने चायनीज तैपेईच्या हुई टी चांगचा 7-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. याशिवाय मानसी अहलावत 62 किलो गटातही पात्र ठरू शकते, तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विनेश फोगटने राष्ट्रीय चाचण्यांच्या दोन वजनी गटात भाग घेतला. महिनाभरापूर्वी विनेशने 48 तासांच्या संघर्षानंतर राष्ट्रीय महिला कुस्ती चाचण्या जिंकल्या होत्या. तिने 50 किलो वजनी गटात शिवानी पवारचा 11-6 असा पराभव केला. 53 किलो गटाच्या उपांत्य फेरीत तिला तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे अंजूकडून 0-10 असा पराभव पत्करावा लागला होता.

विनेशला भारतासाठी दुसरा कोटा
विनेशने पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताला कुस्तीचा दुसरा कोटा दिला आहे. तिच्याआधी अंतिम पंघलने 53 किलोग्रॅममध्ये ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. ऑलिम्पिकमधील भारताचा हा एकूण 45 वा कोटा आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीत फोगाटने एकही गुण न गमावता पात्रता फेरीत अंतिम फेरी गाठली.
भारतीय कुस्ती दीड वर्षांपासून वादात
गेल्या दीड वर्षांपासून भारतीय कुस्ती वादात सापडली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात देशातील प्रसिद्ध कुस्तीपटूंनी मोर्चेबांधणी केल्यावर हा वाद सुरू झाला. सिंग यांच्यावर कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आणि क्रीडा मंत्रालयाने कार्यकारिणी बरखास्त केली. त्यानंतर दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलनही केले होते. या स्टार कुस्तीपटूने 4 महिन्यांपूर्वी आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला होता. त्यांनी 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान कार्यालयाबाहेर कर्तव्य पथावर त्यांचे पुरस्कार ठेवले होते.
Exit mobile version