विनोबा पुण्यतिथी- संतसंग!

रायगडचे सुपूत्र भारतरत्न आचार्य विनोबांच्या ब्रह्मविद्या मंदिर पवनार (जि. वर्धा) आश्रमात दि. 15 नोव्हेंबर 2021 च्या विनोबा पुण्यतिथी निमित्ताने दि. 10 ते 20 नोव्हेंबर 2021 हे दहा दिवस पवनार आश्रमात राहून सेवा करण्याची संधी मिळाली. हे मी माझे परमभाग्यच समजतो. गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे विनोबा पुण्यतिथीचा कार्यक्रम आश्रम भगिनींनी आश्रमाकरीताच केला होता. त्याचे वृत्तांत आश्रमातून प्रकाशित होणार्‍या ‘मैत्री’ पत्रिकेतील आश्रमवृत्त या सदरात आश्रमसदस्या आदरणीय नविनी बहन यांनी लिहिलेला वाचायला मिळत असे. यावर्षी आश्रमभगिनी व स्थानिक तसेच देशभरातील काही गांधी विनोबा विचारांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन विनोबा पुण्यतिथीचा भावसंपन्न कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची गोडी पर्वणी जगासाठी, समाजासाठी, व्यक्तीसाठी शाश्‍वत ज्ञान प्रकाशदायी अशी होती.

मित्र मिलन ते संगीती
कोरोना प्रादुर्भावापूर्वी विनोबा पुण्यतिथीच्या ‘मित्र मिलन’ कार्यक्रमात देशभरातून येणार्‍या कार्यकर्त्यांच्या निवासाकरीता चार-पाच मोठे पेंडाल (मंडप) उभारावे लागत असत. शिवाय आश्रमाचे राजभवन व राजभवनाचा पुढील व मागील व्हरांडा, बडा देवघर, छोटा देवघर, गोविंदनजी कमरा, मेहमान कमरा, आरोग्यका कमरा, प्रेस आणि आश्रमभगिनींच्या निवासातही इत्यादी ठिकामी निवासाची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात येत असे. तसेच सभागृहासाठीही मोठा कापडी सभामंडप उभारावा लागत असे.सभागृहात मोठा स्टेजही तयार करावा लागत असे. देशभरातील विविध प्रांतातून गांधीविनोबा विचारांच्या ओढीने हे कार्यकर्ते विनोबा पुण्यतिथीला आलेले असून दि. 15 ते 17 नोव्हेंबर तीन दिवस कार्यक्रमात गांधी विनोबा विचार कार्याच्या चर्चेत डुबून, रंगून, रममाण होऊन परतत असत. हा विनोबा पुण्यतिथीचा मित्रमिलनाचा राष्ट्रव्यापी कार्यक्र कोरोनामुळे दोन वर्षे आश्रम भगिनींचाच केला होता. यावर्षी मित्र मिलन ऐवजी संगीतीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना प्रतिबंधक नियम पालनात सर्व जगाला आदर्शवत ठरावे असे पालन करुन मर्यादित असा यावर्षी विनोबा पुण्यतिथीला संगीतीच्या सुक्ष्म कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एकही मंडप नाही, स्टेजही मोठे उभारले नाही. फक्त एका लाकडी लहानशा कॉटचा स्टेज म्हणून उपयोग केला होता. या स्टेज असलेल्या कॉटच्या मागच्या बाजूला असलेल्या व्हरांड्याच्या लोखंडी खांबांना कापडी खादीचा जांभळा निळसर रंगाचा पडदा बांधला होता. या कापडी पडद्यावर हातांनी चरख्यावर कातलेल्या सुताच्या ‘संतांसंग:’ अशी शब्दाक्षरे मांडणी केली होती. या पडद्याच्या वरच्या कडेनी बांबूनी विणलेल्या वस्तूही आकर्षकपणे बांधलेल्या होत्या. पडद्याच्या दोन्ही बाजूला केळीची पाने बांधली होती. आंब्याच्या पानाचे तोरणही पडद्याच्या वरच्या बाजूला बांधले होते. तसेच आश्रमाच्या प्रवेशद्वारावर व आश्रमात प्रवेश केल्यावर पुढे आतील आश्रमाच्या दर्शनी प्रवेशाच्या ठिकाणी (गौतमभाईंच्या निवासाच्या बाजूला) आंब्याच्या पानाचे तोरण बांधले होते. स्टेजवर फक्त बोलणारी एकच व्यक्ती असणार. सूत्रसंचालक, खुर्चीवर, बाकड्यावर बाजूला अंतराने बसून असत. श्रोत्यांसाठी अशाच प्रकारे खुर्च्या मांडलेल्या होत्या. किती काटेकोरपणे पालन, तेही स्वयंस्फूर्तपणे प्रत्येकजण करीत होते. यासाठी कुणाचे दडपणाची गरज भासली नाही. या कार्यक्रमासाठी आलेले कार्यकर्ते स्वेच्छेने सकाळी एक तास सफाई-शेती-रसोई या कामातही सहभागी झाले होते. याचे सारे सुंदर नियोजन आमच्या आश्रमभगिनी आदरणीय ज्योत्स्नाबद्दल यांनी आश्रमभगिनींच्या मार्गदर्शनात केले होते. तसेच वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी फोनवरुन आवश्यक खबरदारीच्या सूचनाही दिलेल्या होत्या. या प्रेरणा देशभ्रतार वर्ध्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दोन तीन वेळा विनोबाजींच्या या पवनार आश्रमाला भेटी दिल्या. एकदा तर सहकुटूंबही त्यांनी या आश्रमाला भेट दिली होती.

संतसंग
विनोबा पुण्यतिथीचा मुख्य कार्यक्रम दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2021 तीन दिवस होता. कार्यक्रम सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 5-30 याप्रमाणे दोन सत्रात आयोजित करण्यात आला होता. या तीन दिवसांच्या सहा सत्रात तीस व्यक्तींनी आपले मनोगत मांडले होते. बोलण्यासाठी विषय होता ‘सतांसंगः’ सज्जनांची संगत. प्रत्येकांनी आपापल्या प्रत्यक्षातील जीवनप्रसंगातून याची मांडणी केली होती. प्रत्येकजणांचे बोलणे हे हृदयस्पर्शी होते. त्यांचे बोलणे समोरच्यांशी प्रतिबिंबीत करीत होते. प्रत्येकाचा प्रत्येक शब्द जीवनाला आकार देणारा होता. जीवनाचा अर्थही सांगत होता. आत्मदर्शनाची भूक वाढवणारा होता. चित्रशुद्धीचा प्रकाश देणारा होता. कुणी सांगत होते घरातील वडीलधारी मंडळी आईवडिलांच्या संस्कारांनी जीवन घडले. कुणी सांगत होते. गीताप्रवचने हे विनोबाजींचे पुस्तक वाचण्यात आले आणि जीवन घडले, कुणी सांगत होते, सर्वोदय शिबिरात संस्थेत गेल्यामुळे जीवनाला दिशा मिळाली, कुणी सांगितले गांधी विनोबा विचारांची पदयात्रा आमच्या गावात आली होती. यामुळे जीवन घडले. तसेच प्रत्येकजण सांगत होते, पवनार आश्रमभगिनींच्या आपुलकीच्या मिळालेल्या वागणुकीने जीवन कळले. आचार्य विनोबाजींचे सहकारी असलेल्या या आश्रमभगिनींचेही मनोगत त्यांच्या प्रत्येकांच्या आपल्या जीवनाची प्रेरक गाथा गांधी विनोबांच्या भूदान, ग्रामदान पदयात्रेतील तसेच आश्रमातील विनोबा सानिध्यांनी ओतप्रोत भरलेली जीवनप्रसंग ऐकताना एक वेगळीच ओळख होत होती. याच ओळखीने जीवनाला सर्वत्र ईश्‍वरदर्शनाची दृष्टी मिळते. ‘संतमेळा’ याची देही याची डोळा पाहणे झाले. संतकृपेनी त्यात सहभागीही होता आले. व्यक्ती समाज घडतो कसा याचे दर्शन झाले. याचीच आज घरीदारी सर्वत्र समाजात गरज आहे. आश्रमातील ऋषीतुल्य गौतमभाई म्हणत होते, ‘वर्षातून एकच मोठे मित्र मिलन आयोजित करण्यापेक्षा अशी लहानलहान स्वरुपाची वर्षभरातून चार जरी संगीती केल्या तर सोईचे आहे. कोरोना प्रादुर्भावानंतरचे असे संगिती संमेलन अतिशय परिणामी संयुक्तिक असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. आत्मप्रचितीसाठी अशा लहान लहान कार्यक्रमाचा लाभ मात्र मोठा दूरगामी सखोल शाश्‍वत असा मिळतो. याची सुक्ष्म अनुभूती यावर्षी पवनार आश्रमातील विनोबा पुण्यतिथीच्या कार्यक्रमात सर्वांना आली. आश्रमाचा दैनंदिन नित्यक्रम गांधी विनोबांच्या विश्‍वशांतीच्या शाश्‍वत विचारांनी चाललेला आहे. हमारा मंत्र- जयजगत् ! हमारा तंत्र- ग्रामस्वराज्य! हमारा लक्ष- विश्‍वशांती!

Exit mobile version