पालकमंत्र्यांचा पुढाकार
2 कोटींचा निधी मंजूर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक भारतरत्न विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचे जन्मस्थान असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामधील मौजे गागोदे बुद्रूक येथे त्यांच्या विचारांचे जतन व्हावे व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वांना उपलब्ध व्हावी, याकरिता आचार्य विनोबा भावे यांचे शिल्प साकारले जाणार आहे.त्यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यानुषंगाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जिल्ह्यातील विविध भागात शिल्पांची निर्मिती व उभारणी करणे याकरिता रु.2 कोटी 92 लाख 32 हजार मंजूर करण्यात आले असून यापैकी रु.56 लाख निधीची तरतूद आचार्य विनोबा भावे यांचे शिल्प उभारणीकरिता करण्यात आली आहे.
या स्मारकाच्या ठिकाणी आवश्यक असलेली विकासकामे करण्याबाबत पालकमंत्री कु.तटकरे यांनी उपविभागीय अधिकारी, पेण यांना दिलेल्या निर्देशानुसार तयार करण्यात येत असलेल्या प्रकल्प विकास आराखड्यात वाचनालय, गावांतर्गत रस्ते, स्वागत कमान, तलाव क्षेत्राचे सुशोभीकरण करणे आदी तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन योजनेंतर्गत मंजूर असलेली योजना जलदगतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले आहेत. विकासकामे करताना आचार्य विनोबा भावेंच्या आठवणींना उजाळा देण्यासह या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व आवश्यक विकासकामांसाठी लागणारा पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत.
जेजेकडून शिल्पाची निर्मिती
आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या गागोदे बुद्रुक ता.पेण या गावाचे अनन्यसाधारण महत्व असून जे.जे.स्कूल ऑफ आर्टस् कडून साकारण्यात येणार्या या शिल्पाद्वारे जनसामान्यांमध्ये आणि नवीन पिढीला त्यांच्या सर्वधर्म समभाव, प्रेम व सद्भावना निर्माण करणार्या कार्याची माहिती सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे.
विनोबा भावे यांचे जीवनपट उलगडणारे हे शिल्प लवकरच साकारण्यात येणार आहे. या शिल्पातून त्यांचे कार्य समजून येणार आहे. यामुळे सौंदर्यींकरणात भर पडणार असून ऐतिहासिक ठेवाही जपला जाणार आहे. जिल्ह्यातील आकर्षणाचा ते केंद्रबिंदू ठरणार. – अदिती तटकर, पालकमंत्री