पोलिसांचा विधानसभा अध्यक्षांना अहवाल
| मुंबई | प्रतिनिधी |
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा सदस्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबाबत विधानसभा सुरक्षेतील पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक अहवाल सादर केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या अहवालात असे उघड झाले आहे की, अनेक आमदार सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी लॉबीत त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देतात आणि कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या व फोटो सेशन करतात. ही घटना केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून, ती सर्वच पक्षांच्या आमदारांकडून घडत असल्याचे समोर आले आहे.
विधिमंडळाच्या विधानसभेतील सदस्य हाऊसमध्ये जाण्यापूर्वी लॉबीत आपल्या कार्यकर्त्यांनाही प्रवेश देतात. लॉबीत अनेक आमदार कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या आणि फोटो सेशनही करतात. हे प्रकार काही ठराविक नाही तर सर्वच पक्षातील आमदारांकडून होत असून, सुरक्षा रक्षकांनी रोखल्यास थातूरमातूर कारणं दिले जातात. विधानभवनाच्या लॉबीत नियमानुसार आमदारांसोबत असलेल्या शासकीय स्वीय सहाय्यकालाच जाण्यास परवानगी असते. मात्र आमदार या नियमांची पायमल्ली करत आहेत, असा अहवाल विधानसभा सुरक्षेस असलेल्या पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. दरम्यान, याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्रालय सुरक्षा पोलिसांना ओळखपत्र पाहिल्याशिवाय कुणालाही विधानभवनात न सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी आणि सदस्य लॉबीतही फक्त स्वीय सहाय्यकांना ओळखपत्र तपासूनच सोडण्यात यावे, असा सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.