| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवकपदासाठी निवडणुकीचा बिगुल वाजला असून आचारसंहिता लागू झाली आहे. असे असतानाही सायन-पनवेल महामार्गावरील खांदा वसाहती समोरच्या पुलावर राजकीय पक्षांचे फोटो, बॅनर व जाहिराती अद्याप तशाच असल्याचे चित्र दिसत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर तात्काळ अशा प्रकारची प्रचार सामग्री काढणे बंधनकारक असते. परंतु, प्रत्यक्षात मात्र या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पालिकेचे आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नेमलेले अधिकारी नेमके कुठे आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नियम सर्वांसाठी समान असावेत की काहींसाठी वेगळे, अशी चर्चा देखील परिसरात सुरू आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करून राजकीय फलक हटवावेत व आचारसंहिता काटेकोरपणे राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







