कर्जतमध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे हे 29 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवाराचे छायाचित्र असलेल्या साड्यांच्या पिशव्या मतदारांना देण्यात येत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून त्याबाबत अपक्ष उमेदवार यांचे प्रतिनिधी केतन बेलोसे यांनी तक्रार दाखल केली आहे. कर्जत विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघात सध्या रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे उमेदवाराकडून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचा निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. याच अनुषंगाने यावेळी महिला वर्गाने जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यावा, यासाठी मतदारसंघामध्ये महिलांना साडी वाटप करण्यात येत आहेत. त्याबद्दल केतन बेलोसे यांनी एक व्हिडिओ आणि आपली तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते केतन बेलोसे यांनी सदर तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात दाखल केली आहे. या तक्रारीसोबत त्यांनी एक व्हिडीओ जोडला आहे. या व्हिडीओ मध्ये, महायुतीच्या उमेदवाराचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह लावलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साड्या ठेवण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या साड्यांसोबत एक स्टीकर आहे आणि त्यावर “आपल्या दुसर्‍या विकासपर्वाचे भागीदार व्हा, उमेदवारी अर्ज भरायला माझ्या सोबत चला’’ असा मजकूर लिहिला आहे.आपल्या तक्रारीमध्ये केतन बेलोसे यांनी, ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी आहे, असे म्हटले आहे. तसेच सर्व प्रकरणाची चौकशी करून तत्काळ कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन त्यांनी निवडणूक आयोगाला केले आहे.विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपल्या पक्षाचा प्रचार-प्रसार करने आणि मतदारांना आमिष दाखवणंहे आचारसंहिता भंग समजला जातो.याबद्दल महायुतीचे उमेदवाराकडून मतदारांना भेटवस्तूंचे आमिष दाखवून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Exit mobile version