सुधागडात शासनाच्या आदेशाची पायमल्ली

वसुधा सोसायटीत अनधिकृत बांधकाम सुरू, विडसई ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण


| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून, शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी शनिवारी (दि.20) ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय्य हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या दिवशी रविवार (दि.21) रोजी उपोषण कर्ते आणि प्रशासन यांच्यात कोणतीही चर्चा होऊन तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे.यावेळी उपोषण कर्ते सचिन वाघमारे यांना विविध स्थरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. आमच्या मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा इशारा उपोषणकर्ते सचिन वाघमारे यांनी प्रशासनाला दिला आहे.

ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 21 ते 30 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या दालनासमोर झालेल्या विडसई ग्रामस्थांच्या यशस्वी आमरण उपोषणानंतर प्रशासनाने अनधिकृत कमान तोडून अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, प्लॉट नं. 28 येथे होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल वेळोवेळी सुधागड तहसीलदारांना अर्ज देऊनसुद्धा त्या कामावर बंदी आली नाही. सदर ठेकेदार व सदर प्लॉट मालकाने प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही, हे विडसई ग्रामस्थांच्या लक्षात आले व सदर प्रशासन हे पैशाने बलाढ्य असलेल्या श्रीमंतांची पाठराखण करते, असे ग्रामस्थांना वाटू लागले आहे. वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेमध्ये विशेषतः प्लॉट नं. 28 येथे जे काही अनधिकृत बांधकाम झालेले आहे. विडसईकडे जाण्याच्या मार्गावरील जे काही जांभा दगडाची भिंत व सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे ते तात्काळ तोडण्यासाठी शनिवार (दि.20) पासून ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा न्याय्य हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला ऑल इंडिया पँथर सेना रायगड यांनी पाठिंबा दर्शवीला आहे.

Exit mobile version