जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विचारतेय कोण?

बंदी असतानाही जड-अवजड वाहनांचा बेकायदा सुळसुळाट
दहावीच्या विद्यार्थ्यांसह पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट बंदी आदेश काढूनही अलिबाग-कुरुळ-सहाण बायपास रेवदंडा मार्गावर जड-अवजड वाहने बेधडक धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदेशाची उघडपणे पायमल्ली होत असताना प्रशासनाचे नियंत्रण कुठे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. शनिवारी सकाळी या बेकायदा वाहतुकीमुळे भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि दहावीचे विद्यार्थी परीक्षेला जाताना अडकले; तर शनिवार-रविवार व होळीच्या सलग सुट्ट्यांमुळे फिरण्यासाठी आलेले पर्यटक तासन्‌‍तास रस्त्यावर खोळंबून पडले.

अलिबाग-कुरुळ-बेलकडे-सहाण बायपास-नागाव-रेवदंडा तसेच अलिबाग-कुरुळ-नवेदर बेली-आक्षी-नागाव-रेवदंडा या मार्गांवर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, मोरी व पुलांची दुरुस्ती आणि नव्या बांधकामांची कामे सुरू आहेत. ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने रस्ता अरुंद झाला असून, वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी 9 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदीचे आदेश दिले होते. मात्र, काही चालकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत बंदीच्या वेळेतच मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू ठेवली. याचा फटका सर्वसामान्यांना बसला.


कुरुळ ते बेलकडे, ढवर ते सहाण बायपासदरम्यान ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, विशेषतः दहावीचे परीक्षार्थी, वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी धावपळ करताना दिसले. नियमित प्रवाशांनाही कामावर पोहोचण्यास विलंब झाला. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेले पर्यटक कोंडीत अडकून हैराण झाले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही अवजड वाहनांचा सुळसुळाट सुरू राहिल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका
शनिवारी सकाळी झालेल्या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका दहावीच्या विद्यार्थ्यांना बसला. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी निघालेले अनेक विद्यार्थी कुरुळ, बेलकडे आणि सहाण बायपास परिसरात कोंडीत अडकले. काहींना वाहन सोडून पायी धाव घ्यावी लागली. मानसिक तणावात परीक्षा द्यावी लागल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पोलिसांची दमछाक
सलग सुट्ट्या, पर्यटकांची वाढती गर्दी आणि बंदी आदेश धुडकावून धावणारी जड-अवजड वाहने यामुळे वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांची मोठी दमछाक झाली. ठिकठिकाणी होमगार्ड, स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवकांना तैनात करून कोंडी फोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. अरुंद रस्ते आणि सुरू असलेली बांधकामे यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
बॅरिकेट्‌‍सचा अभाव
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील बेलकडे, सहाण बायपास, रेवदंडा रस्त्यावर रस्त्याचे काम सुरू आहे. खोदकाम करण्यात आले आहे. सतत वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा त्रास प्रवाशांसह विद्यार्थ्यांना होतोय. बॅरिकेट्‌‍स लावल्यास वाहतूक सरळ मार्गाने होईल. कोंडी नियंत्रणात आणता येईल; परंतु बॅरिकेट्‌‍सचा अभाव असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांच्या अहवालानुसार अलिबाग-सहाण बायपास-रेवदंडा मार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेत प्रवेश बंद केला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. तरीदेखील आदेशाचे उल्लंघन होत असेल तर चुकीचे आहे. याबाबत पोलिसांना विचारणारा केली जाईल.

– संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी

सलग सुट्ट्या आणि सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे कोंडी वाढली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी होमगार्ड, स्थानिक पोलीस व सामाजिक संस्थांची मदत घेतली असून, बंदीचे फलक लावण्याचे काम सुरू आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जड-अवजड वाहनांवर कारवाई केली जाईल आणि बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येईल.

– सरिता चव्हाण, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

Exit mobile version