| मुंबई | वृत्तसंस्था |
शानदार खेळी करत असलेला भारताचा फलंदाज विराट कोहलीने 2011 पासून नॉकआउट सामन्यातील अपयशाचा ठपका वानखेडे मैदानावर पुसून टाकला. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वर्ल्डकप 2023 मधील सेमीफायनल लढतीत विराटने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचेदोन विक्रम मोडले. यामध्ये विश्वचषकातील सर्वाधिक धावांचा आणि एकदिवसीय शतकांचा सचिन तेंडुलकरचा समावेश आहे.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धमाकेदार सुरूवात करून दिल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. रोहितने विराटला स्थिर होण्यासाठी पुरेसे वातावरण तयार करून ठेवले होते. या संधीचा फायदा त्याने सोडला नाही. आधी गिल आणि नंतर श्रेयस अय्यर सोबत विराटने महत्त्वाची भागिदारी केली.
विराटने 27व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर या विश्वचषकामधील सहावे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर 34व्या षटकात विराटने सचिन तेंडुलकरचा 20 वर्षे जुना विक्रम मागे टाकला. सचिनने 2003च्या विश्वचषकामध्ये 673 धावा केल्या होत्या. विश्वचषक क्रिकेटच्या इतिहासात एका स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाला इतक्या धावा करता आल्या नव्हत्या. 2019 साली रोहित शर्माने 648 आणि डेव्हिड वॉर्नरने 647 धावा केल्या होत्या. हे दोन फलंदाजी सचिनच्या जवळ पोहोचले होते. पण त्यांना विक्रम मोडता आला नाही. सचिनचा हा विक्रम विराट कोहलीने आता मागे टाकला आहे. विराटने या स्पर्धेत 2 शतकं आणि 6 अर्धशतकांसह 674 हून अधिक धावा केल्या आहेत.
एका विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आता विराटच्या नावावर झाला आहे . विशेष म्हणजे विराटने याच स्पर्धेत सचिनच्या एकदिवसीय सामन्यामधील 49 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.विश्वचषकामधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडल्यानंतर विराट कोहलीने सचिनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणखी एक मोठा विक्रम मोडीत काढला. एकदिवसीय सर्वाधिक शतकांच्या सचिनच्या विक्रमाला विराटने मागे टाकले. विराटने न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करत सचिनचा विक्रम मोडला.
विराटच्या या खेळीत त्याने केलेला आणखी एक मोठा विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने रिकी पॉन्टिंगच्या 13 हजार 704 धावांचा विक्रम मागे टाकले . विराटच्या पुढे आता कुमार संगकारा 14 हजार 232 धावांसह दुसऱ्या तर 18 हजार 426 धावांसह सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.
विराट कोहलीची वर्ल्डकप 2023 मधील कामगिरी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध- 85
अफगाणिस्तान विरुद्ध- नाबाद 55
पाकिस्तान विरुद्ध-16
बांगलादेश विरुद्ध- नाबाद 103
न्यूझीलंड विरुद्ध- 95
इंग्लंड विरुद्ध- 00
श्रीलंका विरुद्ध- 88
द.आफ्रिका विरुद्ध- नाबाद 101
नेदरलँड्स विरुद्ध- 51
न्यूझीलंड विरुद्ध- 115