| मुंबई | प्रतिनिधी |
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीच्या चर्चा वर्षभरात जोरदार रंगल्या. मात्र दोघांनीही त्यांच्या वनडे कामगिरीने सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. 2025 या वर्षात भारतासाठी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हे दोघे अव्वल दोन क्रमांकावर आहेत.
यंदाच्या वर्षभरात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला. मे महिन्यात दोघांनी अचानक कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या वनडेतील भविष्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांनी वनडेतून निवृत्त व्हावे यासाठी अनेक प्रयत्नही झाल्याचे दिसले. मात्र दोघांनीही या संपूर्ण वर्षात त्यांच्या वनडेतील कामगिरीने सर्वच टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. वयाच्या पस्तीशीनंतर हे दोघे कितपत योगदान देतील, असा प्रश्न विचारणाऱ्यांना त्यांनी त्यांच्या बॅटने उत्तर दिल्याचंच आकडेवारीतून दिसून येत आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेसह भारताचे 2025 वर्षातील भारताचे वनडे सामने संपले. भारतीय संघासह विराट आणि रोहितसाठी हे वर्ष खास ठरले. भारतीय संघाने 2025 च्या सुरुवातीलाच वनडेतील प्रतिष्ठीत स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा रोहितच्या नेतृत्वात जिंकली. भारताने 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.या संपूर्ण वर्षात भारताने 14 वनडे सामने खेळले. यातील 11 सामने भारतीय संघाने जिंकले, तर केवळ 3 सामने पराभूत झाले. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांविरुद्ध वनडे मालिका खेळली. इंग्लंडविरुद्ध भारताने मायदेशात वनडे मालिकेत 3-0 असा विजय मिळवला. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मात्र भारताला वनडे मालिकेत 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धही नुकतीच भारताने मायदेशात वनडे मालिका जिंकली.
वनडेत विराट आणि रोहितने 2025 मध्ये मैदानं गाजवली आहेत. या वर्षात वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट अव्वल क्रमांकावर आणि रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये केवळ एकाच धावेचे अंतर आहे. 2025 वर्षात विराटने 13 वनडे सामन्यांमध्ये 3 शतके आणि 4 अर्धशतकांसह 65.10 च्या सरासरीने 651 धावा केल्या आहेत. रोहितने 2025 वर्षात सर्व 14 वनडे सामने खेळले असून 50 च्या सरासरीने 2 शतके आणि 4 अर्धशतकांसह 650 धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त कोणी 500 धावांचा टप्पाही पार केलेला नाही.
विराट कोहली, रोहित शर्माने वर्ष गाजवलं
