विराट कोहली ऑस्ट्रेलियात इतिहास रचणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेची अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. मालिकेतील पहिली कसोटी पर्थ येथे होणार आहे. यानंतर अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे चार सामने खेळवले जातील. या मालिकेत सर्वांच्या नजरा भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर असतील. दोघेही करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. अशा परिस्थितीत घरच्या मैदानावर बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर सर्वांच्या नजरा या दोघांकडे लागल्या आहेत. कोहलीला गेल्या 10 डावात केवळ 192 धावा करता आल्या आहेत.

आता त्याला ऑस्ट्रेलियातही विशेष कामगिरी करण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणार्‍या परदेशी फलंदाजांच्या यादीत तो ब्रायन लाराला मागे टाकू शकतो. याशिवाय जर त्याचा दौरा चांगला गेला तर तो महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकेल.

ब्रायन लाराने ऑस्ट्रेलियात 19 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 35 डावात 1469 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने 4 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकावले आहेत. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणार्‍या परदेशी खेळाडूंमध्ये तो दहाव्या क्रमांकावर आहे. विराटला हे स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. त्याने ऑस्ट्रेलियात 13 सामन्यांच्या 25 डावात 1352 धावा केल्या आहेत. लाराला मागे टाकण्यासाठी विराटला 118 धावा कराव्या लागतील.

सचिनबद्दल बोलायचे झाले तर त्याने 20 सामन्यांच्या 38 डावात 1809 धावा केल्या आहेत. त्याने 6 शतके आणि 7 अर्धशतके केली आहेत. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणार्‍या परदेशी खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत इंग्लंडचा जॅक हॉब्स आघाडीवर आहे. त्याने 24 सामन्यात 2493 धावा केल्या आहेत. कोहलीला सचिनला मागे टाकायचे असेल तर त्याला 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 458 धावा कराव्या लागतील. विराटसाठी ही फार मोठी गोष्ट नाही. पण त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला यासाठी जबरदस्त पुनरागमन करावे लागणार आहे. कोहलीने 2011 पासून कांगारूंविरुद्ध 25 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 47.48 च्या सरासरीने विराटने 2042 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 8 शतके आणि 5 अर्धशतके आहेत. तसेच कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या 186 धावा आहे.

Exit mobile version