विराटचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा

दक्षिण आफ्रिकेतील अनपेक्षित मालिका पराभवानंतर निर्णय
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अनपेक्षित पराभवानंतर विराट कोहलीने शनिवारी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जाण्याआधी मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावरून ‘बीसीसीआय’शी त्याचे संबंध चिघळले होते.
“प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. भारताचा कसोटी कर्णधार म्हणून माझ्यासाठी तो क्षण आता आला आहे. या वाटचालीत अनेक चढ-उतार आले आहेत. पण प्रयत्नांची कमतरता किंवा विश्‍वासाचा अभाव कधीच नव्हता,’’ असे कोहलीने ‘ट्विटर’वर मांडलेल्या निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-2 अशा फरकाने गमावली. त्यानंतर 24 तासांत कोहलीने हा निर्णय घेतला. संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषकानंतर कोहलीने ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले, तर ‘बीसीसीआय’ने त्याची एकदिवसीय कर्णधारपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर कोहली आणि ‘बीसीसीआय’ यांच्यातील संबंध बिघडले होते. ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नकोस, असे विराटला सांगितल्याचा दावा ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने केला होता. मात्र ‘बीसीसीआय’कडून कर्णधारपद सोडताना कुणीही अडवले नाही. फक्त दीड तास अगोदर एकदिवसीय कर्णधारपदावरून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले, असे कोहलीने दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यामुळे कोहली आणि ‘बीसीसीआय’ यांच्यात वाद रंगला होता.

सात वर्षांचा प्रवास
2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर महेंद्र्रंसह धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर ‘बीसीसीआय’ने कोहलीची नियुक्ती केली होती. कोहलीच्या कसोटी नेतृत्वाच्या कारकीर्दीत भारताने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान गाठले. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे उपविजेतेपद पटकावले. याशिवाय ऑस्ट्रेलियात संस्मरणीय विजय नोंदवले.

Exit mobile version