। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी वेळ द्यायला हवा आणि संयमही राखायला हवा. त्यांना लय सापडली की पुन्हा एकदा यशाचा आलेख मोठ्या प्रमाणात उंचावला जाईल, असा विश्वास भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी व्यक्त केला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-2 असे पिछाडीवर पडलेल्या भारताने मुंबईत होणार्या तिसर्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी जोरदार सरावाने सुरुवात केली आहे. बंगळूरू आणि पुणे कसोटीत झालेल्या चुका सुधारण्यासाठी हा सराव महत्त्वाचा होता. सराव सुरू होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत नायर यांनी विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. यात अर्थात प्रमुख मुद्दा होता तो रोहित आणि विराट यांच्या अपयशाचा. रोहित आणि विराटबाबत विचारले असता नायरने अर्थातच त्यांची पाठराखण केली आहे. या दोघांना त्यांच्या पद्धतीने पुन्हा फॉर्मात येण्यासाठी वेळही द्यायला हवा, असे सांगितले. सर्वच जण कठोर मेहनत घेत आहेत. त्यांचा दृष्टिकोन आणि हेतूही प्रामाणिक आहे, म्हणूनच थोडा वेळ देणे महत्त्वाचे आहे, असेही मत नायर यांनी व्यक्त केले आहे.