| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या करीयरमधील 100 वा कसोटी सामना खेळत आहे. विराटसाठी हा सामना खूप खास आहे. कारण 100 व्या कसोटीपर्यंत पोहोचताना त्याने अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. सध्या विराटचा पडता काळ सुरु आहे. त्याच्यावर टीका होतेय. मागच्या अडीचवर्षांपासून विराटच्या बॅटमधून शतक निघालेलं नाही. त्यामुळे देशभरातील क्रिकेट चाहते विराटच्या शतकाच्या प्रतिक्षेत आहेत. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 70 शतके झळकावली आहेत. यात 43 शतके वनडेमध्ये तर 27 शतके कसोटीमध्ये झळकावली आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळताना कामगिरीत सातत्य ठेवणं, सोपं नाहीय. पण विराटने प्रचंड मेहनतीने हे साध्य करुन दाखवले आहे. 100 व्या कसोटीआधी विराट कोहलीला बीसीसीआयकडून सन्मानित करण्यात आले. हेड कोच राहुल द्रविड यांनी विराटच कौतुक करताना त्याला मानचिन्ह प्रदान केले. विराटने देखील सर्वांचे आभार मानले. यावेळी पत्नी अनुष्का शर्मा सुद्धा विराटसोबत मैदानावर उपस्थित होती.