जपली ढोलकी बनविण्याची परंपरा
| रोहा | प्रतिनिधी |
हिंदू धर्मात ढोलकी हे पारंपारिक वाद्य आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील सण समारंभात ढोलकीचे विशेष महत्त्व असते. अशी ही ढोलकी बनविण्यासाठी मुस्लीम बांधवांचेही हात राबत आहेत. 200 वर्षांहून अधिक काळ असलेला हा पांरपारिक व्यवसाय शेख कुटूंबातील चौथी पिढी आपला पांरपारिक व्यवसाय संभाळून आपला उदरनिर्वाह करित आहे.
लखनऊ येथील रहिवासी असणारे शेख कुटूंबिय ढोलकी व्यवसायाच्या निमित्ताने रोहा येथे आले. वर्षानुवर्षे आपल्या रोजीरोटीसाठी व्यवसाय करणारे पंजोबा हाजी अली शेख व आजोबा हाजी मागन यांच्या पश्चात बल्लू शेख व त्यांचा मुलगा अबीद्दीन शेख यांनी हा व्यवसाय पुढे नेला. ही कुशल कारागीर मंडळी गेली अनेक वर्षांपासून गौरी गणपती सणाच्या तोंडावर रोह्यामध्ये येऊन सुंदर व आकर्षक ढोलक्या बनवून आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय असून, सुमारे 200 वर्षांहून अधिक काळापासून ते ढोलकी तयार करणे व विक्री करणे हा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायात त्यांची ही चौथी पिढी उतरली आहे. ते तयार करीत असलेल्या ढोलक्या या विविध आकार व प्रकारच्या असतात. ढोलकीची सुबकता, बाहेरील नक्षीकाम व आकार तसेच प्रकारावरून ढोलकीची किंमत ठरवतात. आपल्या भारत देशाची संस्कृती ही जगात महान अशी संस्कृती आहे. याच संस्कृतीने जगासमोर सर्वधर्मसमभाव व सर्वधर्मसहिष्णूतेचा आदर्श घालून दिला आहे. याच अनुषंगाने रोह्यातील या मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्मातील सण समारंभात लागणारी ढोलकी तयार करून व आपले कौशल्ये दाखवून एक प्रकारे आपल्या आदर्श संस्कृतीचे दर्शनच घडवून दिले आहे.
