ढोलकी विक्रेते बाजारात दाखल
| अलिबाग | प्रमोद जाधव |
सर्वांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. गणेशोत्सवात आरती, भजनाला लागणारी ढोलकी बाजारात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी ढोलकी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे बाजारात ढोलकीचा नाद घुमू लागला आहे. ढोलकी तयार करण्यासाठी लागणार्या साहित्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने यंदा ढोलकीची किंमत 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या कालावधीत भजन, कीर्तनांसह वेगवेगळे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याने एक वेगळा उत्साह, आनंद या कालावधीत निर्माण होणार आहे. सकाळी व संध्याकाळी गणरायाची आरती घरोघरी केली जाते. पारंपरिक वाद्य ढोलकी वाजवून आरती करण्याची परंपरा आजही ठिकठिकाणी आहे. त्यामुळे ढोलकीला या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
गणरायाचे आगमन 19 सप्टेंबरपासून घरोघरी होणार आहे. जिल्ह्यामध्ये एक लाखपेक्षा अधिक ठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. काही ठिकाणी पाच दिवसांचे, दहा दिवसांचे व 21 दिवस गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजारात गेल्या चार दिवसांपासून ढोलकी विक्रेत्यांनी आपली दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. मुंबई, ठाणे येथून ढोलकी विक्रेते दाखल झाले आहेत. लहान ढोलक्यांपासून मोठ्या आकाराच्या ढोलक्या तसेच जंबे तयार करण्यापासून त्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. पुठ्ठ्यांसह फणस, आंबा, शिसव आदी लाकडांपासून तयार केलेल्या ढोलक्या बाजारात उपलब्ध झाल्याचे पहावयास मिळत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या ढोलक्या 300 रुपयांपासून अडीच हजारांपर्यंत बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विक्रीला अद्याप सुरुवात झाली नाही. मात्र, गणरायाच्या आगमनाच्या आठ ते दहा दिवसांपासून ढोलकी विक्रीला अधिक गर्दी होईल, असा विश्वास ढोलकी विक्रेते सय्यद शेख यांनी सांगितले.
ढोलकीच्या किमतीत वाढ
वाढत्या महागाईमुळे ढोलकी तयार करण्यासाठी लागणार्या कच्च्या मालाची किंमत 10 ते 20 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेने लाकडाच्या ढोलकीच्या किमतीमध्ये शंभर रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत, तर पुठ्ठ्यांच्या ढोलकीच्या किमतीमध्ये 50 ते 100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा ढोलकीच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यात वेगवेगळ्या आकाराचे जंबे एक हजार 900 ते दोन हजार 500 रुपये किंमत असून, लहान आकाराची लाकडी ढोलकी 300 रुपयांपासून दोन हजार 350 रुपये आहे. तसेच पुठ्ठ्यांची ढोलकी 450 रुपयांपासून विक्रीला ठेवण्यात आली आहे. अवघ्या दीड तासात ढोलकी तयारगेल्या दोन दिवसांपासून अलिबागमध्ये ढोलकी विक्रेते दाखल झाले आहे. ढोलकी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. लाकडाला पॉलीश करण्यापासून रंगकाम करणे, चामडे लावणे, दोरीने ढोलकी योग्य पद्धतीने बांधणे अशा अनेक प्रकारची कामे करण्यासाठी तब्बल दीड तास लागतो. मात्र, जंबे तयार करण्यासाठी तीन तास लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.