| बीड | प्रतिनिधी |
माझं वय झालं म्हणायला तुम्ही माझं काय बघितलं. तुम्हाला सत्तेच्या बाजूला जायचं तर जा. पण ज्यांच्या जिवावर तुम्ही निवडून आलात, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवा. पण ते नाही केलं, लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना दिला.
बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वाभिमान सभेत बोलताना त्यांनी अजित पवार गटावर नाव न घेता जोरदार प्रहार केला. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. भाजपाचा पराभव करुन तुम्ही सत्तेत आलात आणि आज भाजपाच्या दावणीला बसायची भूमिका तुम्ही मांडत आहात. उद्या मतदान करण्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल. तेव्हा कोणतं बटण दाखवायचं आणि तुम्हाला कुठे पाठवायचं हा विचार मतदार केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी खडसावून सांगितले.
केंद्र सरकारवर देखील पवार यांनी टीका केली आहे. समाजात अंतर निर्माण होईल याची खबरदारी आजच्या राज्यकर्त्यांकडून घेतली जात आहे. खतांची किंमत वाढली आहे. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
मणिपूरला मोदींनी जावे
मणिपूरमधील हिंसाचाराबद्दलही त्यानी संताप व्यक्त केला. तेथे स्त्रियांची धिंड काढली जात आहे, पण भाजप गप्प आहे. मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र यांनी जायची गरज होती. अधिवेशनात अविश्वास ठराव आल्यावर ते शेवटच्या काही मिनिटांत बोलले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना आवरायची वेळ आली आहे, असे शरद पवार म्हणाले.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात असलेल्या रुग्णालयात अनेकांचा जीव गेला. लोकांना रुग्णालयात गेल्यावर त्यांना आधार मिळाला पाहिजे. पण सरकार यावर बघ्याची भूमिका घेत आहे.
खा. शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस