| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमधील खाडीकिनाऱ्यावर युरोप, रशिया आणि मध्य आशियामधून स्थलांतरित पक्षांचे आगमन झाले आहे. यामध्ये ओरिएंटल डार्टर, सापपक्षी, काळ्या डोक्याचा शराटी ब्लॅक, टेलेड गॉडविट्स अशा प्रजातींचा समावेश असून खाडी किनाऱ्यावरील वावर वाढल्याने पक्षी प्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
निसर्गरम्य परिसर, हिरवीगार वनराई आणि खारघर रेल्वे स्थानकापासून ते पेठगाव अशा दूरवर पसरलेल्या खारघरच्या खाडीच्या जलाशयात देशविदेशातील पक्ष्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे. खारघर सेक्टर सोळामधील वास्तुविहार आणि सेक्टर सत्तावीस रांजणपाडा, एकोणीस मुर्बी गाव लगत असलेल्या खाडीकिनारा खाडी किनाऱ्यावर युरोप, रशिया आणि मध्य आशिया देशातील पक्षी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यात युरोप, रशिया आणि मध्य आशियामधून ब्लॅक टेलेड गॉडविट्स, ओरिएंटल डार्टर, सापपक्षी कर्ल्यू सँडपायपर्स आणि आदी पक्ष्यांसह आफ्रिका देशातील रोहित, सारस बगळे, रेड बुलबुल, गुलाबी स्टारलिंग, कॉमन किंगफिशर, पॅसिफिक गोल्डन प्लेव्हर, सॅन्डपीपर, चिमणी, घार, गरुड, किंगफिशर, उघड चोच करकोचा, रंगीत करकोचा, हुदहुद्या, तुताऱ्या, गरुड, घार, खंड्या, बगळे, राखी बगळे, लाजरी पाणकोंबडी, शराटी, शेकाटे, पाणकावळे यांचाही समावेश आहे.
लांब पायाचा ‘लिमोसा' आकर्षण खारघर खाडी किनारी ब्लैक टेल्ड गोडवीट, कर्ल्यू सँडपायपर्स, पॅसिफिक गोल्डन प्लोवर यांच्यासह अनेक विदेशी पक्षांची रेलचेल आहे. सँडपायपर्स, हा एक लांब चोचीचा किनाऱ्यालगत आढळणारा मोठा पक्षी तर ब्लैक टेल्ड गोडवीट हा यांचा रंग काळसर असून लांब पायाचा पक्षी असून त्यास ‘लिमोसा' या नावाने देखील ओळखले जाते. विशेष म्हणजे हा पक्षी भारत, बांगलादेश, युरोप, जपान, पाकिस्तान, सायबेरिया आदी देशात दिसून येतो. तर ‘पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर' हा सागरकिनारी आढळणारा पक्षी आहे. जो सायबेरिया देशात दिसून येतो. इतरही देश विदेशी पक्षी खारघर खाडीकिनारी असून पक्षी निरिक्षणाचा आनंद पक्षीप्रेमी घेत आहेत.